

मंठा (जालना ) : तालुक्यातील उमरखेड येथील ग्रामसभेत ग्रामस्थांच्यावतीने गावातील दारूबंदी व जुगार अड्डा कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
ग्रामसभेत गावातील महिला व पुरुषांनी मिळून गावातील दारूबंदी व जुगार अड्डा कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्धार करत मंठा पोलीस निरीक्षक यांना सदरील विषयी निवेदन दिले आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे की, सदरील धंद्यातून या लोकांची कमाई वाढलेली असल्यामुळे ते कोणास जुमानत नाहीत ते पैशाच्या ताकदीवर गावात दहशत व गुंडगिरी निर्माण करीत आहे. गावात जुगार मटका यासारखे धंदेदेखील चालू आहेत यामुळे देखील तरुण वर्गावर मोठा परिणाम होत आहे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. याबाबत गावातील महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयाकडे गावातील अवैधधंदे बंद करण्याबाबत अनेक वेळा विनंती केली होती. त्या मुळे १७ सप्टेंबर २५ रोजी ग्रामसभा घेऊन सभेत दारूबंदी व जुगार अड्डा बंद करण्याचा सर्वानुमते ठराव पास करण्यात आला आहे.
त्यामुळे पोलिस प्रशासनाच्या वतीने अवैधरीत्या दारू विक्री करणारे व जुगार अड्डा चालवणारा कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रसंगी सरपंच सरपंच आनंद जाधव, उपसरपंच प्रताप जाधव, शालेय समिती अध्यक्ष प्रसाद जाधव, ग्रामपंचायतचे सदस्य सुनील शिंदे, रमेश राठोड, राजेश पवार, तसेच गावातील तरुण अजित राठोड, आदर्श जाधव, ऋषिकेश जाधव, महादेव शिंदे, संदीप जाधव, रोशन राठोड, मोहती पवार, गजानन डोंबे, दिलीप राठोड यांची उपस्थित होती.
रस्त्यावरून फिरणे झाले अवघड; संसार उद्ध्वस्त
गावातील अवैधरीत्या दारू विक्री करणारे गावासह परिसरातील तरुणांना व्यसनाधीन करत आहेत. तसेच गावातील व परिसरातील काही तळीराम रोडवर व गावात दारू पिऊन फिरत आहेत. त्यामुळे मुलांना व महिलांना रोडवरून वावरणे देखील कठीण झाले आहे. अति दारू सेवनामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले असून बाप लेकांमध्ये मारामारी होत आहे.