चांगल्या माणसांना भेटायला कधीच प्रॉब्लेम नसतो; दमानिया यांचे जरांगेंच्या भेटीनंतर सूचक विधान
वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज (दि.३) अंतरवाली सराटीत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण मनोज जरांगे पाटील यांनी आणि अंजली दमानियांनी उचलून धरले होते. त्यामुळे, संतोष देशमुख प्रकरणावरुन या भेटीला वेगळे महत्व आहे. (Anjali Damania meet Manoj Jarange)
या भेटीविषयी अंजली दमानिया म्हणाल्या की, दोन-तीन दिवसांपूर्वी एका सभेमध्ये दादांना चक्कर आली होती. त्यामुळे दादांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आज त्यांची भेट घेतली. आम्ही आतापर्यंत कधीही भेटलो नव्हतो, फक्त फोनवर चर्चा झाली होती. म्हणून मी आज ठरवून भेटू घेतली, सगळ्यात चांगल्या माणसांना भेटायला कधीच काही प्रॉब्लेम नसतो, असेही दमानिया म्हणाल्या.
दरम्यान, या ठिकाणी सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हेदेखील उपस्थित होते. या भेटीत मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणावर चर्चा झाल्याची माहिती आहे.
संतोष देशमुख खून प्रकरणाबाबत काही चर्चा झाली का, असा प्रश्न विचारला असता, याला पुढची दिशा कशी द्यायची यावर चर्चा झाली. मला त्या चार्टशीटमध्ये सगळंच्या सगळं अर्धवट वाटत आहे. आरोपी सुदर्शन घुलेच स्टेटमेंट जेव्हा माध्यमांसमोर आलं, मला ते पूर्णपणे अर्धवट वाटलं. कारण, त्यात खुनानंतर पुढे काय झालं, तो कुठे गेला, कोणाच्या मदतीने बाहेर राहिला, तेव्हा कराडशी त्याचं बोलणं झालं की नाही याबाबत चकार शब्द सुद्धा स्टेटमेंटमध्ये लिहिलेलं नाही, असे अंजली दमानिया म्हणाल्या.
सहआरोपींमुळे धागेदोरे थेट धनंजय मुंडेंपर्यंत
पोलिसांनी असे अर्धवट स्टेटमेंट का घेतलं, मी मागे म्हटलं होतं की 10 लोकं आहेत, त्यांना सहआरोपी करणं गरजेचं होतं. व्हिडिओमध्ये राजेश पाटील दिसले, प्रशांत महाजन दिसले, हे सगळं असताना सुद्धा या कोणालाच, शिवलिंग मोराळे असो बालाजी तांदळे असो असे असंख्य लोक आहेत. डॉ. वायबसे असो कोणालाही सह आरोपी केलेलं नाही. यांना जर सहआरोपी केल तर याचे धागेदोरे थेट धनंजय मुंडे पर्यंत जातात, म्हणून हे मुद्दाम केलं गेलं नाही, असा आरोपही दमानिया यांनी केला आहे.
भेटीनंतर जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया
तब्येतीची विचारपूस करण्यासाठी ताई मुंबईहून जालन्यात आल्या होत्या. अंजली ताईंच्या कामाचा आवाका मोठा आहे, तरी पण त्यांनी ठरवलं भेटायला जाऊ आणि त्या भेटीसाठी आल्या. बीडला शिक्षकाच्या कार्यक्रमांमध्ये माझं शरीर थंड पडलं होतं, त्यानिमित्ताने ताई तब्येतीची विचारपूस करायला, मला भेटायला आल्या दुसरं काही नव्हतं, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी भेटीनंतर दिली आहे.

