

जालना, पुढारी वृत्तसेवा: दिपावली सणात बाजारपेठेत होणारी उलाढाल, आणि गतिमान अर्थचक्र कायम ठेवण्यासाठी महाराष्ट्र विधानसभेची आचारसंहिता दिवाळीनंतर लागू करावी, अशी मागणी आम आदमी पार्टीचे प्रदेश सचिव विनयकुमार कोठारी यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
अप्पर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार यांची विनयकुमार कोठारी यांनी भेट घेऊन त्यांच्यामार्फत निवडणूक आयोगास निवेदन दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष संजोग हिवाळे, जिल्हा संघटक सुभाष देठे, शहराध्यक्ष तनुज बाहेती, शहर सचिव रवींद्र सूर्यवंशी, जनसंपर्क प्रमुख फेरोज बागवान, सादेक खान, रवींद्र म्हस्के, राजेश जैन, महेंद्र लड्डा, भारत वर्मा आदींची उपस्थिती होती.
निवडणूक आयोगास पाठवलेल्या निवेदनात विनयकुमार कोठारी यांनी म्हंटले आहे की, सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरा होत असलेला दीपावली सण अवघ्या १५ दिवसांवर येऊन ठेपला आहे. खरीपाची पिके सध्या काढणी सुरू असून शेतमाल विक्री नंतर शेतकऱ्यांच्या घरात दिवाळी साजरी होते. असे विनयकुमार कोठारी यांनी नमूद केले. दिवाळीत खरेदीसाठी मोठी वर्दळ असते. कापड, किराणा, फटाके, सोने, चांदी, वाहने, यासह विविध वस्तुंची मोठ्या प्रमाणात विक्री होत असून गाव पातळीवर छोटे व्यापारी गुंतवणूक करून मालाची ने- आण करतात.
बाजार पेठेसह अर्थव्यवस्थेला चालना देणारा दीपावली सण असल्याने आचारसंहिता लागू केल्यास सर्वत्र चेक पोस्ट राहतील. त्यामुळे शेतकरी, व्यापारी, व्यावसायिक, खरेदीसाठी येणारे ग्राहक यांना तपासणी यंत्रणेमुळे मोठ्या मर्यादा येतील. शेतकरी शहरात खरेदीसाठी येऊ शकणार नाहीत. ग्राहकच रोडावल्यामुळे बाजारपेठेची उलाढाल आणि अर्थचक्र मंदावेल, याचा थेट परिणाम शेतकरी, कामगार, किरकोळ विक्रेते, व्यापारी यांच्यासोबतच राज्य आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर दिसून येईल. असे विनयकुमार कोठारी यांनी निदर्शनास आणून दिले.
दीपावलीनंतर आचारसंहिता लागू केल्यास बाजारपेठेचे अर्थचक्र स्थिर राहून शासकीय अधिकारी, कर्मचारी वृदांना सुद्धा कुटुंबीयांसोबत सणाचा आनंद घेता येईल. असे नमूद करत दीपावली नंतर आचारसंहिता लागू करावी, अशी मागणी विनयकुमार कोठारी यांनी केली.