ओबीसींना धक्‍का कसा लागणार नाही हे सरकारनं सांगावं : लक्ष्मण हाके

ओबीसी उपोषण
ओबीसी उपोषण

वडिगोद्री , जालना : पुढारी ऑनलाईन लक्ष्मण हाके यांनी जालन्यातील वडिगोद्री यथे ओबीसींसाठी उपोषण सुरू केलं आहे. हाके यांच्या आंदोलनाचा आज नववा दिवस आहे. आज सरकारी शिष्‍टमंडळाने हाकेंची उपोषणस्‍थळी भेट घेतली. गिरीश महाजन, अतुल सावे आणि उदय सामंत हे हाकेंच्या भेटीला आले आहेत. यावेळी ओबीसी कार्यकर्त्यांची शिष्‍टमंडळासमोरच घोषणाबाजी सुरू केली. यामुळे येथे गोंधळ सुरू झाला. दरम्‍यान गिरीश महाजन यांनी सरकार कुणावराही अन्याय करणार नसल्‍याचे सांगितले.

दरम्‍यान हाके यांनीओबीसींना धक्‍का कसा लागणार नाही हे सरकारनं सांगावं अशी भूमीका घेतली. मनोज जरांगे आणि सरकारपैकी नेमकं खरं कोण बोलतंय ? असा सवाल लक्ष्मण हाकेंनी महाजन यांच्यासह सरकारी शिष्‍टमंडळाला केला. त्‍यावर गिरीष महाजन यांनी सरकार कोणत्‍याही समाजावर अन्याय करणार नाही. तुम्‍ही तुमचे शिष्‍टमंडळ चर्चेसाठी पाठवावं असं सांगितलं. मराठा आणि ओबीसी आरक्षणावर सरकार योग्‍य तोच निर्णय घेईल अशी भूमीका गिरीश महाजन यांनी मांडली.

आंदोलनाला गालबोट लागू देऊ नका : हाके

आपण सरकारला आणखी एक संधी देऊ अशी भूमीका हाके यांनी मांडली. यावेळी हाकेंच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. सरकारने दुटप्पी भूमिका घेऊ नये असं आंदोलकांचं म्‍हणण होतं. दरम्‍यान हाके यांनी आंदोलकांना आंदोलनाला गालबोट लागू देऊ नका असं आवाहन केलं. यावेळी आंदोलकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चेसाठी आंदोलनसस्‍थळी यावं अशी मागणी केली. ओबीसींच्या आरक्षणाला धक्‍का लागायला नको अशी मागणी हाके यांनी केली.

दरम्‍यान यावेळी हाके यांना फडणवीसांचा फोन आला. त्‍यांच्याशी त्‍यांनी चर्चा केली. यानंतर हाके यांची मुख्यमंत्र्यांशीही फोनवर चर्चा झाली. दरम्‍यान हाकेंच्या मागण्यांसंदर्भात मुंबईत आज बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. भुजबळांच्या नेतृत्‍वात शिष्‍टमंडळ आज सरकारशी चर्चा करणार आहे.

वडीगोद्री येथे उपोषणकर्ते लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांचे ओबीसीसाठी उपोषण सुरू आहे. उपोषणाच्या आजच्या नवव्या दिवशी राज्य सरकारच्या वतीने चर्चा करण्यासाठी उपोषणस्थळी सरकारचे शिष्टमंडळ वडीगोद्री येथे दाखल झाले.

या शिष्टमंडळात मंत्री गिरीश महाजन, मंत्री उदय सामंत, मंत्री अतुल सावे, खा. संदीपान भुमरे, आ.गोपीचंद पडळकर, माजी मंत्री अर्जुन खोतकर व जालना जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांचा समावेश होता. यावेळी ओबीसी कार्यकर्त्यांनी शिष्टमंडळासमोरच घोषणाबाजी केली. यामुळे येथे गोंधळ झाला.

ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही : गिरीश महाजन

उपोषणकर्त्यांशी चर्चा करताना मंत्री महाजन म्हणाले की, यातून काहीतरी मार्ग निघायला हवा. आम्हाला हाके यांच्या प्रकृतीची काळजी आहे. उपोषण सुटलं पाहिजे आम्ही या मताचे आहोत. आम्ही ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. तुमच्या भूमिकेशी आम्ही कायम आहोत. चर्चेतूनच मार्ग निघेल. तुमचं शिष्टमंडळ मुंबईत पाठवा. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा करू. एका चर्चेत मार्ग निघाला नाही तरी ईतर चर्चेत मार्ग निघेल जास्त दिवस उपोषण बरोबर नाही असे मंत्री गिरीश महाजन यांनी लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे या उपोषणकर्त्याशी चर्चा करताना सांगितले.

सरकार म्हणतं आरक्षणाला धक्का लागत नाही. इतर लोक म्हणतात आम्ही आरक्षणात घुसलोय. मग खरं कोण बोलतंय,?आमच्यातील लोकांचं काय होणार याची आम्हाला चिंता आहे, ओबीसी हा वंचित आहे. सरकारने ठराविक लोकांच्या आंदोलनाला रेड कार्पेट टाकू नये. सरकारने आमच्या विषयाला गांभीर्याने घ्यावे असे हाके मंत्री गिरीश महाजन यांना म्हणाले.

अधिकाऱ्यांमार्फत जरी लेखी आश्वासन दिले तरी स्वीकारायला तयार आहे. लेखी आश्वासन न मिळाल्यास उपोषण सुरूच ठेवणार. ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी सर्व लोकांना बरोबर घेणार आहे. हे लोक आमच्या वेदनांकडे लक्ष देत नहीत, फक्त निवडणूका जिंकण्याकडे लक्ष देत असल्याचे हाके यावेळी म्हणाले.

आम्हाला सरकारकडून लेखी पत्र हवं आहे. मागच्या दाराने ओबीसी प्रमाणपत्र वाटप करणे बंद करा, त्यांना ओबीसी प्रमाणपत्र वाटणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा. आमच्या बाबत वेगळी भूमिका घेऊ नका. सावत्र भूमिका आमच्या बाबतीत नको. स्थानिक स्वराज्य संस्थेतील आमचं आरक्षण गेलंय. या राज्यात काय सुरू आहे. लेखी आश्वासन द्या तरच उपोषण सोडू अन्यथा जीव गेला तरी उपोषण सोडणार नाही. जातीयवाद करणाऱ्या माणसाचा सरकारने लाड करू नये. आमचं आरक्षण आबाधित राहील असं लेखी आश्वासन द्या,असे दुसरे उपोषणकर्ते नवनाथ वाघमारे म्हणाले.

आमचं सविस्तर बोलणं झालेलं आहे. सगळ्या मुद्द्यावर संविस्तर चर्चा होईल. लक्ष्मण हाके यांच्या मुद्द्यांवर चर्चा होईल. मीही बैठकीला उपस्थित राहणार आहे. हाके यांच्या आंदोलनाला गालबोट लावू नका असे आवाहन पडळकर यांनी आंदोलकांना केले.

मी पाण्यावरच जगणार, मी पाणी अधून मधून पीत आहे. कुणीही रास्ता रोको किंवा आंदोलनाला गालबोट लावू नका असे आवाहन हाके यांनी उपस्थित आंदोलकांना केले.

मंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन लावला. महाजन यांनी लक्ष्मण हाके यांचे मुख्यमंत्र्यांशी फोनवरून बोलणे करून दिले. तसेच उपमुख्यमंत्री फडणवीस हाके यांच्याशी बोलणे झाले. हाके यांनी शिष्टमंडळ मुंबईला पाठवणार असल्याचे फडणवीस यांना सांगितले.

सायंकाळी मुंबईत बैठक हाेणार

आज ५ वाजता सरकारच्या वतीने मुंबईत बैठक होणार आहे. मंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे हे नेते शिष्टमंडळाचे नेतृत्व करणार आहेत. विजय वडेट्टीवार, महादेव जाणकर, प्रकाश शेंडगे, गोपीचांद पडळकर हे या शिष्टमंडलात असणार असल्याचे हाके यांनी सांगितले.

आज संध्याकाळी ५ वाजता ही बैठक होईल. सह्याद्री अतिथी गृहात बैठक होणार आहे.१० -१२ अधिकारी व मंत्री बैठकीत असतील. आम्हाला कोणावरही अन्याय करायचा नसल्याचे मंत्री महाजन म्हणाले.

आमचं शिष्टमंडळ सरकार सोबत चर्चा करेल. छगन भुजबळ शिष्टमंडळाचं नेतृत्व करतील असे उपोषणकर्ते नवनाथ वाघमारे म्हणाले. उपस्थितांकडून जोरदार घोषणाबाजी केली गेली. यावेळी सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news