

86,000 Ladki bahin in the district ineligible
जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना जिल्ह्यात तब्बल ८६ हजार ५१२ लाडक्या बहिणी योजनेतून अपात्र ठरल्या आहेत. ई-केवायसीतील त्रुटी, वार्षिक उत्पन्न मर्यादेपेक्षा अधिक उत्पन्न, विविध शासकीय विभागांच्या नोंदीतील विसंगती आणि पात्रतेच्या निकषांचे उल्लंघन यामुळे या महिलांना योजनेच्या लाभातून वगळण्यात आले असल्याचे महिला व बाल कल्याण विभागाच्यावतीने सांगण्यात आले.
दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर जिल्ह्यात ४ लाख ८४ हजार ६१४ महिला लाभार्थी म्हणून नोंदल्या गेल्या होत्या. मात्र शासनाने लाभार्थ्यांची सखोल पडताळणी मोहीम हाती घेतल्यानंतर अनेक अर्जामध्ये त्रुटी आणि विसंगती आढळून आल्या. त्यानंतर आतापर्यंत ८६ हजार ५१२ महिला अपात्र झाल्या असून सध्या जिल्ह्यात ३ लाख ९८ हजार १०२ महिला योजनेचा लाभ घेत आहेत.
प्रशासनाने गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून विशेष पडताळणी मोहीम राबविली. यामध्ये आयकर विभाग, आरटीओ तसेच इतर शासकीय विभागांच्या नोंदींची तपासणी करण्यात आली. त्यातून अनेक लाभार्थी पात्रतेच्या निकषात बसत नसल्याचे स्पष्ट झाले.
अपात्रतेची प्रमुख कारणे
वार्षिक कौटुंबिक उत्पन्न निर्धारित मर्यादपेक्षा अधिक
प्रलंबित ई-केवायसी अथवा तांत्रिक त्रुटी
इतर शासकीय योजनांचा लाभार्थी अर्जदार किंवा कुटुंबातील सदस्य आयकरदाता असणे
कुटुंबाच्या नावावर चारचाकी वाहन रेशन कार्डवर दोनपेक्षा अधिक लाभार्थी नोंद असणे.