जरांगे यांच्या आंदोनस्थळावरील मंडप हटवणार असल्याच्या चर्चांना उधाण | पुढारी

जरांगे यांच्या आंदोनस्थळावरील मंडप हटवणार असल्याच्या चर्चांना उधाण

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : अंतरवाली सराटीतील आमरण उपोषणाच्या ठिकाणी असलेला मंडप पोलीस काढणार असल्याच्या बातमीमुळे अंतरवाली परिसर दिवसभर अफवांमुळे चर्चेत राहिला. अंतरवालीत पोलिसांच्या गाड्या दाखल झाल्या आहेत, खूप मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. आरक्षण उपोषणाच्या स्थळावरील मंडप काढण्यात येतोय असे अफवांचे पेव फुटल्याने अंतरवाली सराटीत येणाऱ्यांची रीघ लागली.

छत्रपती संभाजीनगर येथे उपचार घेत असलेले मनोज जरांगे पाटील यांना ही माहिती समजताच ते सलाईन काढून अंतरवलीकडे निघाले असल्याचा बातम्या आल्या. अंतरवाली सराटीकडे मराठा समाजाच्या अनेकांची पावले वळली. पाहता पाहता आरक्षण मंडपामध्ये गर्दी जमू लागली. जरांगे पाटील उपचार घेत असल्याने दोन दिवस झाले अंतरवली सराटीकडे कोणी येत नव्हते. मात्र आज या खोडसाळ वृतामुळे समाज बांधवांची पावली अंतरवाली कडे वळली आणि आंदोलन स्थळ हे गर्दीने गजबजून गेले.

वडीगोद्री येथे पोलिसांचा मोठा फौज वडीगोद्री येथे अंतरवाली फाट्यावर पोलिसांनी येणाऱ्या वाहनांच्या चौकशी करून वाहनांचे नंबर लिहून घेत असल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले व गोंधळ वाढत गेला.

मंडपाला हात लावाल तर याद राखा

जेलमध्ये सडायला तयार आहे पण अंतरवालीतील मंडपातील एक कापडही काढू देणार नाही असं आव्हान मनोज जरांगे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे. त्यामुळे येत्या काळात मनोज जरांगे आणि राज्य सरकारमधील संघर्ष अधिक पेटणार असल्याची चिन्हं आहे.

अंतरवालीकडे निघालेल्या मनोज जरांगे यांचे  पोलिस अधिकाऱ्यांचीशी फोनवरून संपर्क झाला. त्यांनी आरक्षण मंडप काढणार नाही, तुम्ही उपचार घ्या, मंडप हटवण्यात येणार नाही असे आश्वासन पोलिसांनी मनोज जरांगे यांना दिल्याची माहिती मिळाली आहे. मंडपाच्या एकाही कापडाला हात लावला, त्यावरील शिवरायांच्या मूर्तीला हात लावाल तर महागात पडेल असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.

Back to top button