मराठा आरक्षण : मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यासाठी तिसऱ्या दिवशीही नकार | पुढारी

मराठा आरक्षण : मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यासाठी तिसऱ्या दिवशीही नकार

शहागड; पुढारी वृत्तसेवा : अबंड तालुक्यातील अतंरवाली सराटी येथे उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाच्या तिसऱ्या दिवशीही वैद्यकीय उपचारास नकार दिला आहे. यामुळे त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली आहे. मात्र जरांगे पाटील हे आरक्षणाच्या भुमिकेवर ठाम आहेत.

मराठा आरक्षणाविषयी सरकारने काढलेल्या अध्यादेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी जरांगे-पाटील यांनी पुन्हा आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाचा आज (दि. १२) तिसरा दिवस आहे. विशेष म्हणजे मनोज जरांगे यांनी गेल्या तीन दिवसांत पाण्याचा थेंब देखील घेतला नाही. तसेच, उपचार घेण्यासाठी देखील जरांगे यांनी नकार दिला आहे. त्यामुळे कालपासून त्यांची तब्येत देखील खालावली आहे.

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांनी गेल्या महिन्यात थेट मुंबईत धडक दिली होती. मात्र, वेशीवरच त्यांचे आंदोलन थांबवत सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सगेसोयरेबाबत अध्यादेश काढला होता.

आंतरवालीत पुन्हा होऊ लागली गर्दी

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटीमध्ये चौथ्यांदा उपोषण सुरू केले आहे. यापूर्वी त्यांच्या याच उपोषणास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळायची. दरम्यान, १० फेब्रुवारीपासून मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केल्याने आंतरवाली सराटीमध्ये पुन्हा एकदा गर्दी होतांना पाहायला मिळत आहे. जालना जिल्ह्यासह मराठवाड्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील मराठा आंदोलक जरांगे यांची भेट घेण्यासाठी येत आहे. मात्र, कालपासून त्यांची प्रकृती खालावल्याने ते कोणासोबत ही बोलत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Back to top button