जालना : मराठा आरक्षणासाठी स्वत:ला पेटवून घेतलेल्या अंबड तालुक्यातील तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू | पुढारी

जालना : मराठा आरक्षणासाठी स्वत:ला पेटवून घेतलेल्या अंबड तालुक्यातील तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जीवन संपवण्याचा प्रयत्न केलेल्या तरुणाचा शुक्रवारी (दि. १) पहाटे मृत्यू झाल्याची घटना घडली. अंबड तालुक्यातील पाथरवाला बुद्रुक येथील तरुणाने मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी २२ नोव्हेंबर रोजी राहत्या घरात स्वतःला पेटवून घेतल्याची घटना घडली होती.

सकाळी सात वाजताच्या सुमारास सुरज जाधव या पाथरवाला बुद्रुक येथील तरुणाने स्वत:ला राहत्या घरी पेटवून घेत जीवन संपवण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी त्याची आई त्याला वाचविण्यासाठी धावली. दरम्यान यात दोघेही गंभीर भाजले गेले. सुरज ६० टक्के तर त्याची आई ३५ टक्के भाजल्याने जखमी झाले होते.  त्याच्या नातेवाईकांनी मराठा आरक्षणासाठी हे पाऊल उचण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. गेले दहा दिवस त्याच्यावर उपचार सुरु होते. शुक्रवारी (दि. १) त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण होते.

सुरजच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी आरक्षणाची मागणी करत जोपर्यंत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पाथरवाला बुद्रुक गावी येत नाही तोपर्यंत अंत्यविधी करणार नाही अशी भुमिका मांडली. परंतु अंबड तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी मध्यस्थी केल्याने नातेवाईक अंत्यविधी करण्यासाठी तयार झाले. अंबड तहसीलदार यांच्या वतीने मंडळ अधिकारी, तलाठी उपस्थित होते. यावेळी पाथरवाला बुद्रुक येथील मराठा समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले. यामध्ये असे नमुद करण्यात आले आहे की, मयत सूरजचा छोटा भाऊ श्रेयस जाधव हा इयत्ता सहावीमध्ये शिकत असुन त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे त्याचे शिक्षण शासनाने करून , शासकीय सेवेत रुजू करून घ्यावे. सोबतच शासनाने ५० लाख रुपये आर्थिक मदत करावी. २४ डिसेंबर पर्यंत आरक्षणाचा मुद्दा निकाली काढावा जेणेकरून मराठा समाजातील तरुणांना शैक्षणिक फायदा होईल अशा विविध मागण्या शासनानाला मंडळ अधिकारी , तलाठी यांच्या मार्फत अंबड तहसीलदार यांना देण्यात आले.

सुरज जाधव याच्यावर मुळ गाव पाथरवाला बुद्रुक येथे गोदावरी नदीच्या तीरावर अंत्यविधी करण्यात आले. सुरज अंकुशनगर येथील यशवंतराव चव्हाण औद्योगिक प्रशिक्षण केंद्र ( आयटीआय ) मध्ये विजतंत्री व्यवसायात द्वितीय वर्षात शिकत होता. सुरजने तरुण वयात मराठा आरक्षणासाठी बलिदान दिल्याने गावावर शोककळा पसरली आहे. त्याचा पश्चात आई वडील व भाऊ असा परिवार आहे .

Back to top button