

जालना, पुढारी वृत्तसेवा : आगामी विधानसभा निवडणुकीत पाचही विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून ३१ इच्छुकांनी उमेदवारी मागितली आहे. जालन्यातून आ. कैलास गोरंट्याल यांनी शक्तिप्रदर्शन करत पक्षाच्या निरीक्षक खा. डॉ. शोभाताई बच्छाव यांच्याकडे उमेदवारीचा दावा केला. यावेळी उपस्थित समर्थक, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी गोरंट्याल यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाच्या वतीने जालना जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघातून काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती पाठक मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आल्या होत्या.
यावेळी पक्ष निरीक्षक खा. डॉ. शोभाताई बच्छाव यांच्यासह खा. डॉ. कल्याण काळे, प्रदेश उपाध्यक्ष आ. कैलास गोरंट्याल, आ. राजेश राठोड, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, माजी आ. सुरेशकुमार जेथलिया, युवा नेते अक्षय गोरंट्याल, अन्वर देशमुख, शहर जिल्हाध्यक्ष शेख महेमूद, जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र राख, कल्याणराव बोराडे, आदींची उपस्थिती होती जिल्ह्यातील जालना, भोकरदन जाफराबाद, परतूर-मंठा, घनसावंगी आणि बदनापूर-अंबड मतदार संघातील इच्छुकांच्या पक्ष निरीक्षकांनी मंगल कार्यालयातील एका बंद खोलीत मतदार संघनिहाय इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या.
आ. गोरंट्याल म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत पक्षाचे उमेदवार डॉ. कल्याण काळे यांना विजयी करण्यासाठी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्यामुळे काळे हे मोठ्या मताधिक्याने निवडून आले.
विधानसभा मतदार संघातील उमेदवारीसाठी काहीजण हवा देण्याचे काम करत आहेत. मात्र, हवेची दिशा केव्हा बदलेल याची खात्री नसते, असा टोला आ. गोरंट्याल यांनी लगावला. जे कुणी उमेदवारीसाठी दावे करत आहेत. ते आम्ही वाढवलेले बगलबच्चे असून, त्यांना जनतेतून नगर पालिकेत जाता आले नाही, अशांना आम्ही मागच्या दाराने पाठवले. पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्या इच्छुक उमेदवारांचा विचार करावा.