

20-year-old youth murdered over financial dispute
जालना, पुढारी वृत्तसेवाः पैशाच्या आर्थिक देवाणघेवाणीतून झालेल्या वादातून एका २० वर्षीय तरुणाची निघृण हत्या करण्यात आली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपीने मृतदेह स्वतःच्या स्कॉर्पिओ गाडीतून नेऊन दुधना नदीच्या वाहत्या पाण्यात फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऋषीकेश प्रकाश पवार (२०, रा. योगेशनगर, जालना) असे मृत तरुणाचे नाव आहे. ऋषीकेश हा २२ सप्टेंबर २०२५ रोजी घराबाहेर गेल्यानंतर परतला नव्हता. याप्रकरणी २४ सप्टेंबर २०२५ रोजी तालुका जालना पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती.
दरम्यान, कदिम जालना पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्याच्या तपासादरम्यान, अविनाश अंकुश वाघमारे (रा. माळीपुरा, जुना जालना) याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने ऋषीकेशची हत्या केल्याची कबुली दिली.
कबुलीनुसार, २२ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५:३० च्या सुमारास बठाण शिवारातील स्वतःच्या शेतात ऋषीकेशसोबत आर्थिक व्यवहारावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर झटापटीत झाले आणि आरोपीने ऋषीकेशचा गळा आवळून त्याचा जीव घेतला. त्यानंतर मृतदेह स्कॉर्पिओ गाडीतून नेऊन गोलापांगरी येथील पुलावरून दुधना नदीच्या पाण्यात फेकून दिला.
आईच्या रक्ताच्या नमुन्यांची डीएनए चाचणी
पोलिसांनी अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडलेल्या एका अज्ञात मृतदेहाचा तपास केला असता, त्या मृतदेहाची आणि मिसिंग असलेल्या ऋषीकेशच्या आईच्या रक्ताच्या नमुन्यांची डीएनए चाचणी करण्यात आली. प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालात, तो मृतदेह ऋषीकेश पवार याचाच असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल वसंत भगवानराव धस यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, आरोपी अविनाश वाघमारे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम १०३(१) आणि २३८ अन्वये तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.