

17 small projects overflow in the Jalna district
जालना, पुढारी वृत्तसेवा गत आठवड्यात जिल्हाभरात झालेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील ७ पैकी दोन मध्यम प्रकल्पाची पाणीपातळी ९० टक्क्यांच्यावर तर १७लघु प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. जालना तालुक्यातील कल्याण मध्यम प्रकल्प क्षेत्रात अजूनही जोरदार पाउस पडला नसल्याने या प्रकल्पाची पाणीपातळी जोत्याखालीच असल्याचे दिसून येत आहे. आजच्या तारखेस जालना जिल्ह्यात ५२.३४ टक्के इतका उपयुक्त पाणीसाठा उलब्ध झाला आहे. यामुळे यावर अवलंबून असलेल्या पाणी योजना, सिंचनांची वर्षभराची चिंता मिटली आहे.
जालना जिल्ह्यात एकूण सात मध्यम आणि ५४ लघू प्रकल्प आहे. या प्रकल्पांची उपयुक्त पाणी साठ्याची आकडेवारी २३४.८८ दलघमी इतकी आहे. सध्या २१ जून पर्यंत कल्याण मध्यम प्रकल्प, कल्याण गिरीजा, अप्पर दुधना, जुई मध्यम प्रकल्प, धामणा, जुई आणि गलाटी या सात मध्यम प्रकल्पात गत आठवड्यात केवळ १९.९३ दलघमी साठा उपलब्ध होता. मात्र, या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे सुमारे ३५.१८ दलघमी त्याची टक्कवारी सुमारे ५३.४८ इतकी वाढली आहे. तर ५७ लघु प्रकल्पात ६८.३८ दलघमी इतका उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे.
दरम्यान, गत आठवड्यात जालना जिल्ह्यात सर्व दूर पावसाने धुमाकूळ घातला होता. बदनापूर, जाफराबाद, अंबड, आणि भोकरदन तालुक्यात ढग फुटी सदृश्य पाऊस झाला. पाच मंडळात अतिवृष्टीमुळे या भागातील मध्यम लघु प्रकल्पाची पाणी पातळी वेगाने वाढली. अंबड तालुक्यातही चांगला पाऊस झाला होता. यामुळे तेथील प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ झाली.
जालना जिल्ह्यातील १२ लघु प्रकल्पाची पाणी पातळी जोत्याखाली आली आहे. या प्रकल्पात जालना तालुक्यातील दरेगाव पाझर तलाव, निरखेडा तांडा, वानडगाव, कुंभेफळ, भोकरदन तालुक्यातील प्रल्हादपूर, जाफराबाद तालुक्यातील चिंचखेडा पाझर तलाव, अंबड तालुक्यातील मार्डी, डावरगाव, रोहिलागड, कानडगाव, धनगर पिंप्री, बदनापूर तालुक्यातील सोमठाणा आदींचा समावेश आहे.