

₹15 crore tender stalled; sanitation in shambles!
जालना, पुढारी वृत्तसेवा : शहरातील स्वच्छता व्यवस्थेसह रखडलेली विकासकामे, पाणीपुरवठ्यातील लिकेज, शाळा बांधकाम, रस्ते, पथदिवे आणि आरोग्य केंद्रातील रिक्त पदांवरून गुरुवारी (दि. १०) झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रशासनाला सदस्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. १५ कोटी रुपयांचे स्वच्छता टेंडर अद्याप प्रलंबित असल्याने प्रभागांमध्ये स्वच्छता होत नसल्याचा मुद्दा सभापती श्रावण भुरेवाल यांनी उपस्थित केला.
भारत रत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृहात झालेल्या या सभेला महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत, आयुक्त अंजली शर्मा, नगर सचिव केशव कानपुडे यांच्यासह पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
सभापती श्रावण भुरेवाल यांनी बाह्यस्रोत आणि नियमित कर्मचाऱ्यांमध्ये ताळमेळ नसल्याने स्वच्छता व्यवस्थेवर परिणाम होत असल्याचे सांगितले. नवीन टेंडर प्रक्रिया करण्याची मागणी त्यांनी केली. यावर स्थानिक आमदारांशी चर्चा करून प्रश्न सोडविण्याच्या सूचना आयुक्त अंजली शर्मा यांनी संबंधित विभागाला केल्या. चार निविदाधारकांनी निविदा भरल्या असून त्यांची छाननी सुरू असल्याचे उपायुक्त वंदना गायकवाड यांनी सांगितले. एका निविदेसाठी सुमारे १२०० कागदपत्रे तपासावी लागत असल्याने प्रक्रिया वेळखाऊ असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
शाळेच्या ५० लाख रुपयांच्या कामाचा मुद्दाही समेत गाजला. साडेतीन वर्षे उलटूनही शाळेचे बांधकाम सुरू झाले नसल्याबद्दल सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. सध्या विद्यार्थी भाड्याच्या खोलीत शिक्षण घेत असल्याचे सांगण्यात आले. डीपीसीचा निधी परत जाण्यापूर्वी काम सुरू करण्याची मागणी करण्यात आली. संगीता गोरंट्याल यांनी एक-दोन व्यक्तींचा विरोध वगळता शाळेला कोणाचाही विरोध नसल्याचे सांगितले.
ही सेमी इंग्लिश शाळा असून गावाकडील विद्यार्थीही येथे शिक्षण घेत असल्याने मंजूर झालेली शाळा त्याच ठिकाणी उभारावी, अशी मागणी त्यांनी केली. कोठारी नगर, दत्तनगरसह विविध भागांतील वारंवार फुटणाऱ्या पाइपलाइन आणि लिकेजमुळे नागरिकांना त्रास होत असल्याचा मुद्दा सभेत मांडण्यात आला. पाणीपुरवठा अभियंता राजेश बगळे यांनी १३५ कोटींच्या कामाचा संदर्भ देत पाणीपुरवठ्याचे नकाशे उपलब्ध करून देण्यात येईल असे सांगितले.
ढोरपुरा येथील आरोग्य केंद्र बंद
ढोरपुरा येथील आरोग्य केंद्र बंद असल्याचा मुद्दा चांदवडे यांनी उपस्थित केला. कर्मचारी पूर्णवेळ थांबत नसल्याने नागरिकांना आरोग्यसेवेपासून वंचित राहावे लागत असल्याचे सांगण्यात आले. एक आरोग्य अधिकारी आणि स्टाफ नर्सचे पद रिक्त असून केवळ एक एमपीडब्ल्यू कार्यरत असल्याने औषधोपचाराची अडचण निर्माण होत असल्याचे सांगण्यात आले. आउटसोर्सिंगद्वारे कर्मचारी भरण्याची मागणी करण्यात आली. तुंडीवाले यांनी कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर व स्वच्छता निरीक्षकांवर कारवाईची मागणी केली. तसेच दारू दुकानांना एनओसी देण्यात आली आहे का, याची चौकशी करून संबंधित दुकानावर कारवाई करण्याची मागणी केली.
विसर्जन मिरवणूक मार्ग डागडुजीचा मुद्दा ऐरणीवर
गणेश मिरवणूक आणि विसर्जन मार्गावरील रस्त्यांची तातडीने डागडुजी करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी बांधकाम अभियंता सय्यद साउद यांनी प्रथम मुख्य रस्त्याची डागडुजी करून त्यानंतर इतर भागातील रस्त्यांची कामे केली जातील, असे स्पष्ट केले. शिवाय, बसस्थानक परिसरापासून रस्त्यांच्या कामाला सुरुवात झाली असल्याचेही सांगून गणेश विसर्जन मार्गाचेही काम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. यावर सदस्य दुर्गेश कोठोठीवाले यांनी गणेशोत्सव दोन दिवसांवर येवून ठेपला आहे. तुम्ही केंव्हा करणार असा सवाल उपस्थित केला.