जालना : युती-आघाडीत उमेदवारीसाठी चुरस इच्छुकांची तिकिटासाठी मोर्चेबांधणी, बंडखोरीची शक्यता

tug of war for candidency
युती-आघाडीत उमेदवारीसाठी चुरस इच्छुकांची तिकिटासाठी मोर्चेबांधणी, बंडखोरीची शक्यताfile photo
Published on
Updated on

सुहास कुलकर्णी

जालना जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडीच्यावतीने निकडणूक लढविण्यासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केल्याने उमेदवारी कोणाला मिळणार याबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. युती व आघाडीतील नेत्यांना उमेदवारी मिळाल्यानंतर मित्रपक्षाच्या नेते व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जाण्यासाठी कसरत करावी लागणार असे दिसत आहे.

जालना विधानसभा निवडणुकीसाठी आघाडीच्यावतीने विद्यमान काँग्रेसचे आ. कैलास गोरंट्याल हे इच्छुक आहेत. नुकत्याच काँग्रेसच्यावतीने संभाव्य उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यात गोरंट्याल व अब्दुल हाफीज समर्थक एकमेकांना भिडल्याचे दिसून आले. दुसरीकडे आघाडीतील घटकपक्ष असलेल्या शिवसेना उबाठा पक्षाचे जिल्हाध्यक्ष भास्करराव आंबेकर यांनीही पक्षाकडे उमेदवारीसाठी दावा केला आहे. महायुतीकडून शिवसेना शिंदे पक्षाचे माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. महायुतीतील भाजपाचे भास्करराव दानवे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे अरविंद चव्हाण यांनीही पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे.

जालना जिल्ह्यात घनसावंगी हा अतिशय महत्त्वाचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीतही इच्छुकांमध्ये चुरस पहायला मिळत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना सहसंपर्क प्रमुख डॉ. हिकमत उढाण यांनी राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपे यांना कडवी झुंज दिली होती. यावेळी महाविकास आघाडीतून रा.काँ. शरद पवार पक्षाचे राजेश टोपे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. दुसरीकडे महायुतीमधे उमेदवारीसाठी प्रचंड चुरस दिसून येत आहे.

शिवसेना उबाठा पक्षाचे हिकमत उढाण हे महाविकास आघाडीतून उमेदवारी मिळणार नसल्याचे दिसत असल्याने त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. लवकरच ते शिवसेनेत (शिंदे गटात) प्रवेश करणार आहेत. दुसरीकडे भाजपाकडून सतीश घाटगे हे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. या मतदारसंघात भाजपचे सतीश घाटगे यांनी तिकीट मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. गेल्या दोन वर्षांपासून ते मतदारसंघात नागरिकांच्या संपर्कात आहेत. महायुतीच्या सरकारच्या काळात ४८ कोटी रुपयांची विकासकामे केली आहे. राजेश टोपे यांनी या मतदारसंघातून १९९९ पासून आजपर्यंत सलग विजय मिळवला आहे. समृध्दी व सागर कारखाना व शैक्षणिक संस्थामुळे या मतदारसंघात टोपेची मजबूत पकड मानली जात आहे.

बदनापूर विधानसभा मतदारसंघ राखीव असून या मतदारसंघातून भाजपाचे आ. नारायण कुचे हे निवडून आले आहेत. हा मतदारसंघ जागा वाटपात भाजपालाच सुटणार असल्याचे मानले जात आहे. या मतदारसंघातून आघाडीकडून शिवसेना उबाठा पक्षाचे संतोष सांबरे, रा.कॉ. शरद पवार पक्षाकडुन बबलु चौधरी हे इच्छुक आहेत. भोकरदन मतदारसंघातून भाजपाचे संतोष सांबरे यांच्या विरोधात महाविकास आघाडीतुन रा. कॉ. शरद पवार पक्षाचे चंद्रकांत दानवे अथवा काँग्रेसचे राजाभाऊ देशमुख यांच्यातून एका जणास उमेदवारी मिळू शकते.

परतूर विधानसभा मतदारसंघात भाजपाचे माजी मंत्री बबनराव लोणीकर हे भाजपाचे संभाव्य उमेदवार राहणार आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून सुरेशकुमार जेथलिया तर राकॉ शरद पवार पक्षाकडून कपिल आकात यांनी उमेदवारीसाठी दावेदारी केली आहे. महायुती व आघाडीतून कोणाला अधिकृत उमेदवारी मिळणार व कोण बंडखोरी करणार? हे येत्या काही दिवसात समोर येणार आहे. महाविकास आघाडी व महायुतीच्या उमेदवारांना विरोधकांशी लढतानाच मित्रपक्षातील असंतुष्टांना बरोबर घेताना तारे- वरची कसरत करावी लागणार असे दिसत आहे.

जागा वाटपाकडे लक्ष

जालना जिल्ह्यात महायुतीच्या जागा वाटपात पाचपैकी ३ मतदारसंघ भाजपा तर दोन शिव- सेना शिंदे पक्षाला मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीत काँग्रेस २, रा.काँ. शरद पवार २ व १ शिवसेना उबाठा पक्षाला सुटण्याची शक्यता राजकीय गोटातून वर्तविली जात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news