

परतूर; पुढारी वृत्तसेवा : शहरातील सन्मित्र कॉलनी परिसरात राहणाऱ्या एका १६ वर्षीय तरुणाचा मोटार सायकल अपघातात मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि. ३०) दुपारी चार वाजताच्या सुमारास घडली. परतूर-वाटूर रोडवर वडगाव पाटीजवळ असणाऱ्या वळणावर हा अपघात झाला. सुरज बळीराम एरंडे असे या अपघातातील मृत तरुणाचे नाव आहे. राज्य परिवहन महामंडळा परतूर आगारातील चालक बळीराम एरंडे यांचा तो मुलगा आहे.
सूरज मित्रांसोबत आपल्या दुचाकीने (एमएच २१ बीडब्लु ९७६३) वाटूर वरून परतूरच्या दिशेने येत होता. वडगाव पाटी जवळ असणाऱ्या वळण रस्त्यावर भरधाव वेगाने असलेली त्यांची दुचाकी दुभाजकावर आदळून हा अपघात घडला आहे. अपघातात सूरजच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती तर त्याच्या सोबत असणारे त्याचे मित्र सूरज ज्ञानदेव चव्हाण आणि अनिल दत्ता वाघमारे जखमी झाले आहेत.
अपघातानंतर काही प्रवाशांनी तातडीने १०८ रुग्णवाहिकेला अपघाताची माहिती दिली. वाटूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील १०८ रुग्णवाहिकेचे डॉ.अंकुश कुरे आणि चालक बाबा शेख यांनी अपघाता नंतर तात्काळ घटनास्थळ गाठून जखमींना पुढील उपचारासाठी जालना येथे घेऊन जात असतांना रामनगर जवळ गंभीर जखमी सूरज एरंडे याचा मृत्यू झाला. अपघात प्रकरणी परतूर पोलिसात नोंद घेण्याची प्रक्रिया रात्री उशिरा पर्यंत सुरू होती.