

Dharkheda flood news young man dead
औंढा नागनाथ : तालुक्यातील धारखेडा भागात २७ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे ओढ्या नाल्यांना मोठा पूर आला होता. या पूराच्या दरम्यान दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास गजानन रंगराव कऱ्हाळे (वय ४०) धारखेडा गावाकडे जात असताना पुराच्या पाण्यात वाहून गेले.घटनेनंतर ग्रामस्थांनी त्यांचा शोध घेतला, परंतु ते तातडीने सापडले नाहीत. नंतर औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात मिसिंग व्यक्ती म्हणून तक्रार नोंदवण्यात आली होती.
दरम्यान, रविवारी (दि.२८) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास त्यांचा मृतदेह गावाजवळ ओढ्याच्या कडेला आढळला. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक जी.एस. राहिरे, जमादार रविकांत हरकळ आणि तलाठी पुष्पलता जायभाय यांनी घटनास्थळी धाव घेऊन, नागरिकांच्या मदतीने मृतदेह औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आला.
या घटनेने धारखेडा गावात शोककळा पसरली असून, मृत गजानन कऱ्हाळे यांच्या पश्चात त्यांच्या आई-वडील, भाऊ, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.