

हिंगोली: पुढारी वृत्तसेवा : विकासासाठी महायुतीसोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे. परंतु, आम्ही आमच्या पक्षाच्या विचारधारेला तिलांजली देणार नाही. इतरांच्या विचारांचा आदर करून आम्ही आमचे स्वाभिमानी विचार जपू अन् महायुतीच्या उमेदवारास विजयी करू, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार राजू पाटील नवघरे यांनी आज (दि.१४) दिले. Raju Navghare
मागील काही दिवसांपासून आमदार राजू पाटील नवघरे यांच्या भूमिकेबाबत संभ्रम निर्माण झाला होता. त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती. परंतु, आज हिंगोलीत महायुतीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास खासदार हेमंत पाटील, भाजपचे आमदार तान्हाजी मुटकुळे, शिवसेनेचे आमदार संतोष बांगर, माजी खासदार शिवाजी माने, माजी आमदार गजानन घुगे, माजी आमदार रामराव वडकुते यांच्यासह महायुतीतील घटक पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. Raju Navghare
या मेळाव्यास संबोधित करताना त्यांनी सुरूवातीलाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विकासाच्या भूमिकेवर महायुतीत सहभाग नोंदविल्याचे सांगत पक्षाची धर्मनिरपेक्ष विचारधारा कायम राहील, असेही सांगितले. महाविकास आघाडीतही काँग्रेस, शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी झालो. आता विकासासाठी महायुतीत सहभागी झालो आहोत. पक्षाने माझ्यावर समन्वयक पदाची जबाबदारी सोपविली आहे. पक्षाने सांगितल्यानुसार महायुतीच्या मेळाव्यास माझ्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सहभागी झाले आहेत. व्यासपीठावर वेगवेगळ्या विचारधारेचे मान्यवर उपस्थित असले, तरी आम्ही धर्मनिरपेक्ष विचाराने घडलेले कार्यकर्ते आहोत. आम्ही विकासासाठी महायुतीसोबत राहू. परंतु, आमची विचारधारा कायम राहील, असे सांगून राष्ट्रवादीची वसमतसह हिंगोली लोकसभा मतदार संघात ताकद आहे, असा सुचक इशाराही यावेळी त्यांनी दिला. महायुतीच्या उमेदवाराच्या विजयासाठी आमचे कार्यकर्ते परिश्रम घेतील, असा शब्दही त्यांनी यावेळी दिला.
महायुतीच्या मेळाव्यात आमदार राजू नवघरे उपस्थित राहणार असल्याचे जाहीर होताच त्यांच्या स्वागतासाठी जिल्हाभरातील युवकांची मोठी फौज मेळाव्याच्या स्थळी उपस्थित होती. अत्यंत विनम्रपणे आ. नवघरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांचे आदरतिथ्य स्वीकारून मेळाव्यात मोजक्या शब्दांत आपली भूमिका मांडल्याने महायुतीतील सर्वच पक्षांच्या नेत्यांनी त्यांना भरभरून दाद दिली.
हेही वाचा