

भीमराव बोखारे
वसमत : मागील वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी मान्सून लांबल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली असून अनेक हवामान तज्ञांनी आजपर्यंत दिलेल्या हवामान अंदाज फोल ठरत असल्याचे चित्र आहे. अनेक हवामान तज्ञांच्या मते यावर्षी पाऊस हा सरासरीपेक्षा कमी जरी असला तरी तो अति कमी नाही सरासरी मध्ये ९२ ते ९३ टक्के पाऊस होईल असा अंदाज हवामान तज्ञ देत आहेत. तर काही तज्ञांच्या मते अति पाऊस होण्याचा अंदाज सांगितला जात असल्याने शेतकरी संभ्रमात पडले आहेत.
जून महिन्याच्या सुरुवातीलाच मान्सून लांबल्यामुळेच पावसाची मोठी तूट निर्माण झाली असून शेतकरी सध्या संभ्रमात आहेत. मान्सून लांबणीवर व पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे शेतकऱ्यांवर सध्या तरी दुष्काळाचे सावट मिरवत आहे. जूनच्या पहिल्या पंधरवड्यात महाराष्ट्रात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला आहे. म्हणजे तब्बल ७४ ते ७५ टक्के पावसाची तूट नोंदवली गेलेली आहे.
सध्या मान्सूनची संथ गती असून ८ जून रोजी मान्सूनच्या महाराष्ट्राच्या काही भागात प्रवेश केला खरा पण त्यानंतर वेस्टलीं जेट स्ट्रीम च्या प्रभावामुळे मान्सूनची प्रगती थांबली आहे. मुंबई आणि उर्वरित भागात मान्सून आता २५ जून च्या आसपास सक्रिय होईल असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. हवामान तज्ञांच्या मते प्रशांत महासागरामध्ये एल निनो ची स्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे मान्सून कमकुवत होतो. आय एम डी च्या अंदाजानुसार यावर्षी एकूण सरासरी पावसाची ९० ते ९४ इतकी राहण्याची शक्यता आहे.
या परिस्थितीमुळे यंदा दुष्काळाची तीस ते पस्तीस टक्के शक्यता वर्तवण्यात आली असून ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण खूप घटू शकते असा अंदाज वर्तविला जात आहे. वसमत तालुक्यासह जिल्ह्यामध्ये अनेक भागात सुरुवातीला पडलेल्या किरकोळ व पूर्व मोसमी पावसाळा वर विश्वास ठेवून पेरणी करावी की नाही असा संभ्रम शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, किमान ७५ ते १०० मि.मि. पाऊस झाल्ल्यानंतरच पेरणी करावी, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
सोशल मीडियावर आलेल्या हवामान तज्ञांचा ऊत हा शेतकऱ्यांना संभ्रमावस्था निर्माण करणारा ठरत आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार २४ ते २५ जून पासून राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे तर २१ ते २३ जून विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढेल तर १० जुलै ते १५ जुलै या काळात राज्यांमध्ये तुफान आणि मुसळधार पाऊस होईल असा अंदाज व्यक्त केला आहे.