

OBC reservation issue
कळमनुरी : तालुक्यातील सेलसुरा येथील वंजारी समाजातील संतोष शिवाजी कागणे (वय २५) या तरुणाने हैद्राबाद गॅझेटमुळे ओबीसींचे आरक्षण संपणार या चिंतेतून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज (दि. १) पहाटे दोन वाजता घडली. या घटनेनंतर समाजबांधवांनी मृतदेह कळमनुरी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर ठेवत आंदोलन केले.
समाजबांधवांनी शासनाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त करत गॅझेट जारी करणाऱ्या सरकारविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसेच मृत संतोष कागणे यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत व नोकरी देण्याचाही आग्रह धरला. आंदोलनामुळे चार तास तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
संतोष कागणे हे हैद्राबाद गॅझेटच्या पार्श्वभूमीवर ओबीसी आरक्षण धोक्यात येईल, आणि त्यामुळे समाजाचे शैक्षणिक, राजकीय तसेच रोजगाराचे नुकसान होईल, या भीतीत होते. या चिंतेतून त्यांनी आपल्या शेतात विषप्राशन करून गळफास घेत आत्महत्या केली, अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.
घटनेची माहिती मिळताच ओबीसी जनमोर्चाचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली समाजबांधवांनी मृतदेह घेऊन उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर ठिय्या दिला. प्रशासनाविरुद्ध घोषणाबाजी करत त्यांनी शासनाकडून ठोस निर्णय घेण्याची मागणी केली.
या आंदोलनाची दखल घेत पोलीस निरीक्षक रघुनाथ शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक संतोष इंगळे, महसूल अधिकारी राजाराम केंद्रे, तहसीलदार जीवककुमार कांबळे आणि उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा भुते यांनी आंदोलनस्थळी पोहोचून समाजबांधवांशी चर्चा केली. त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मृतकाच्या कुटुंबाला २५ लाख रुपयांची आर्थिक मदत आणि कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरीचा प्रस्ताव पाठवण्याचे लिखित आश्वासन दिले.
या आश्वासनानंतर समाजबांधवांनी आंदोलन मागे घेतले. मात्र, समाजातील कार्यकर्त्यांचा आरोप आहे की जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाने घटनेची योग्य दखल घेतली नाही, उलट ओबीसी कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली आहे. या घटनेमुळे ओबीसी समाजात तीव्र नाराजी असून, हैद्राबाद गॅझेट रद्द करण्याची आणि आरक्षण अबाधित ठेवण्याची मागणी जोर धरत आहे.