

औंढा नागनाथ : सोशल मीडियावर महामानवाबद्दल अपमानास्पद पोस्ट व्हायरल झाल्याने औंढा नागनाथ शहरातील एका परिसरात मोठा तणाव निर्माण झाला. याप्रकरणी शहरातील पोलिस ठाण्यात दोघांविरोधात अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून दुसऱ्याचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. २६) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास इंस्टाग्रामवरून एक आक्षेपार्ह आणि जातीय तेढ निर्माण करणारी पोस्ट व्हायरल झाली. या घटनेची माहिती मिळताच बौद्ध समाजातील तरुणांनी या अपमानास्पद प्रकाराचा तीव्र निषेध व्यक्त केला. या संदर्भात प्रथमेश विलास हूडेकर याला जाब विचारण्यासाठी गेले असता, त्याने अरेरावी करत "तुम्ही मला विचारणारे कोण, मी राम शांताबाई बालाजी वैद्य याने पाठवलेली स्टोरी पुढे शेअर केली आहे," असे सांगितले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाचा अवमान करत उपस्थितांशी वाद घातला. यामुळे औंढा शहरातील एका परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक श्यामकुमार डोंगरे यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्यांनी उपस्थित तरूणांची समजूत काढून परिस्थिती नियंत्रणात आणली आणि रात्री उशिरा गुन्हा नोंदवला. याप्रकरणी दोघांवर अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रथमेश विलास हूडेकर याला ताब्यात घेण्यात आले आहे. राम शांताबाई बालाजी वैद्य हा फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.