

हिंगोलीः औंढा नागनाथ तालुक्यातील शिरड शहापूर येथे हळदीचे मोठे व्यापारी केंद्र असून केंद्रामध्ये तालुक्यातूनच नव्हे तर पर जिल्ह्यातून हळद विक्रीसाठी व खरेदीसाठी व्यापारी व शेतकरी दररोज येथे आपला माल विक्री करण्यासाठी घेऊन येतात. काही व्यापारीवर्ग शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा लाभ उचलून आपला फायदा करून घेत आहे. दरम्यान २४ ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता शिरड शहापूर येथील शेतकरी शिवहार सुदाम चटप वय ३७ वर्ष रा . शहापूर तालुका औंढा याने आपली हळद व्यापारी शेख खुद्दुस शेख इब्राहिम राहणार आर्णी रोड यवतमाळ यांना विक्री केली.
सदर व्यापाऱ्याने शेतकऱ्याची हळद ट्रक मध्ये भरून वसमत येथे विक्री करण्याकरिता नेली, ती हळद विकून आलेल्या पैशातून त्या व्यापाऱ्याने शेतकऱ्याला वसमत मध्ये १ लाख ४३ हजार रुपये दिले व लघुशंकेसाठी बाहेर जातो म्हणून उर्वरित एकूण १४ लाख २३ हजार ७४० रुपये घेऊन सदर व्यापारी पसार झाला. त्यानंतर शेतकऱ्याने व्यापाऱ्याचा मोबाईल क्रमांक लावून पाहिले असता मोबाईल बंद दाखिल्याने शेतकऱ्यास आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर रात्री दोन वाजता औंढा पोलीस ठाण्यात व्यापाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक जी एस राहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक वाघमारे हे करीत आहेत