औंढा नागनाथ : पुढारी वृत्तसेवा : इतर समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी आदिवासी समाज बांधवांनी राज्य शासनाच्या विरोधात आज (दि.३०) दोन ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केले. नागेशवाडी येथील रास्ता रोकोमुळे औंढा - परभणी - वसमत तर पिंपळदरी फाटा येथील रस्ता रोकोमुळे हिंगोली - औंढा राज्य रस्त्यावरील वाहतूक एक तास ठप्प झाली होती. आंदोलनात महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला.
राज्यातील आदिवासी समाजाच्या संवैधानिक अधिकारावर गदा आणण्याचे प्रकार चालू असून अनुसूचित जमाती प्रवर्गात इतर जातीचे समावेश करण्याचा घाट घातला जात आहे, असा आरोप यावेळी आंदोलन कर्त्यांनी केला. आंदोलनस्थळी नायब तहसीलदार लता लाखाडे यांना विविध मागण्याचे निवेदन देऊन रास्तारोको आंदोलन स्थगित करण्यात आले.
निवेदनात आदिवासी समाजाच्या आरक्षणात नव्याने इतर कोणत्याही जातीचा समावेश करण्यात येऊ नये, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार अनुसूचित जमाती ची रिक्त झालेली १२ हजार पाचशे पदे तसेच आदिवासी आरक्षण अनुशेषाची ५५ हजार ६६८ पदे पदभरती द्वारे तात्काळ भरण्यात यावी, औंढा नागनाथ येथे अनुसूचित जमातीच्या मुला मुलींसाठी वस्तीगृह मंजूर करावे, अशा विविध मागण्या करण्यात आल्या.
आंदोलनस्थळी पोलीस निरीक्षक जी. एस. राहीरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण नागरे, उप निरीक्षक पंजाब थिटे, महामार्गाचे खयमोद्दिन खतीब, पोलीस उपनिरीक्षक शेख खुद्दुस, जमादार मोहम्मद शेख, यशवंत गुरुपवार, गजानन गिरी, सुभाष जैताडे, गजानन गोरे यांनी बंदोबस्तात ठेवला होता.