गिरगावः वसमत तालुक्यातील टोकाई सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी थकित वेतन व इतर मागण्यांसाठी मागील दोन दिवसांपासून कारखान्याच्या गेटवर काम बंद आंदोलन व साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे.
टोकाई सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी मागील अकरा महिन्याच्या थकित वेतनाच्या मागणी साठी मागील महिन्यात २४ सप्टेंबर रोजी काही कर्मचारी आमरण उपोषणाला बसले होते.त्यावेळी आमदार राजु नवघरे व तुळजाभवानी साखर कारखान्याच्या अध्यक्षा भावनाताई बोर्डीकर यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर हे आमरण उपोषण पाचव्या दिवशी सोडवण्यात आले पंरतु आतापर्यंत ७५ टक्के कर्मचाऱ्यांचे पगार झाले आहेत. उर्वरित २५ टक्के कर्मचाऱ्यांचे पगार मिळालेले नाहीत हे सर्व जाणूनबुजून केले जात असल्याचा आरोप कारखान्याच्या कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे. कारखान्याच्या आडमुठी धोरणाच्या विरोधात कर्मचाऱ्यांनी एकजुट कायम ठेवत पुन्हा काम बंद ठेवून साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. कर्मचाऱ्यांवर हक्काचे पैसे असुन सुद्धा उपोषण करण्याची वेळ आली आहे.
टोकाई सहकारी साखर कारखाना सहयोग तत्वावर दिला असल्यामुळे कारखान्यातील एकही कर्मचाऱ्यास कामावरून काढता येणार नाही त्यामुळे कुणीही काळजी करू नये असा शब्द कारखान्याचे चेअरमन ॲड.शिवाजीराव जाधव व तुळजाभवानी साखर कारखान्याच्या अध्यक्षा भावनाताई बोर्डीकर यांनी कर्मचाऱ्यांना दिला हे खरं आहे पण आज दिवाळी सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे.तुम्ही जर वेळेवर वेतन दिले नाही तर या कर्मचाऱ्यांनी दिवाळी सण कसा साजरा करायचा हा प्रश्न निर्माण झाला आहे.तसेच जर कर्मचाऱ्यांना दिलेला शब्द पाळला जात नसेल तर शेतकऱ्यांची थकित एफ आर पी रक्कम मिळणार का हा प्रश्न शेतकऱ्यांकडून केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडून बोलण्यात येत आहे की "पडस गेलं आणि खोकला आला" अशी गत टोकाई कारखान्याची झाली आहे.