

हिंगोली : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात कळमनुरी, औंढा व सेनगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात बंजारा समाज आहे. हिंदुंचा पौराणिक सण म्हणून होळी सण महत्वाचा समजल्या जातो. मात्र बंजारा समाजात तांड्यातील मुलांच्या बारशाचा उत्सव म्हणून हा सण साजरा केला जातो. उत्सवाला लागणारी मनोभुमिका आणि वातावरण होळीपुर्वी दोन ते तीन महिने अगाेदर तयार होते. दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या होळी सणाच्या पार्श्वभुमीवर तांड्यावर ठिकठिकाणी लेंगी गीते गायली जात आहेत. ताशाच्या तालांवर फेर धरून ही गीते म्हंटली जातात.
लेंगी गीते दिवाळी झाल्यानंतर गायला सुरूवात केली जाते. रानमाळातून अहोरात्र भटकत असणारा समाज मनाचा विरंगुळा म्हणून लेंगी गीत गातात. कुठे खळ्यावर, जागलीवर, मोटेवर असेल तेथे येतील तेवढे गीत गाण्याचा प्रयत्न केला जातो. यासंदर्भात अधिकची माहिती देताना प्रा.डी.आर.पवार सांगतात की, लेंगी गीताचे दोन प्रकार आहेत. एकट्या दुकट्याने काम करताना किंवा बसून वेगैरे वाद्य वाजवित गावयाच्या लेंगी गीताला बेटीर लेंगी म्हणतात तर दुसरा प्रकार हुबीर लेंगी गीताचा असून तो समुहाने वाद्याच्या तालावर नृत्य करता करता गायली जाते. गंगा जमूनाम संत सेवालाल, संत रामराव, संत तुळशीराम, नायेण कररे! गंगा जमुनाम, गंगा केरे पेट! फुलेरो झाड, उ त ो सातपाच फुल, मारे देवीन चढा!! या गीताचा अर्थ असा की, गंगा यमुनेत प्रभू (संत सेवालाल, संत रामराव, संत तुळशीराम) हे स्नान करीत आहेत, गंगेच्या कुशीत कमळाचे झाड आहे स्नान करून तेथे (संत सेवालाल, संत रामराव, संत तुळशीराम) हे सातपाच कमळ फुले माता जगदंबा देवीला वाहत आहेत. तर दुसर्या लेंगी गीतात पेली समरण करलो संत सेवालालन, संत रामरावेन, संत तुळशीरामेन, पेली समरण !! पेलो तो समरू म धरती मातान रे, बोजा वटाई झाडे तीन हात रे, पेलो समरू याचा भावार्थ असा की, या सर्व प्रथम संत सेवालाल, संत रामराव, संत तुळशीराम यांचे स्मरण करूया, पहिले स्मरण मी पृथ्वी मातेचे करतो, तीने साडेतीन हाताच्या आपल्या या शरीराचे ओझे वाहून घेत आहे.
लेंगी गाणी ऐकता ऐकता रागावत असलेल्या नायक शांत शांत होऊन जाऊन लेंगी गीतास प्रोत्साहीत करतो. दुसर्या लेंगी गीतात आवारे याडी बापु, भेने, नानक्या, मोटे से वेन होळीम खेला, होळी खेला रे सत्य जलम लियो रे, होळी खेलार, झोके ती. या आई, बापु, ताई, लहान मोठे सर्वजण या आपण सर्व मिळून मिसळून होळी खेळु या, होळी खेळल्यामुळे सत्याचे राज्य जन्माला येईल. एक्याने होळी खेळूया आणि मग लग्न न झालेला तरूण यावर्षी ज्याचे लग्न करावयाचे आहे अशास गेरी या म्हणतात. नायक, तरूण व्यक्ती मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना घेऊन होळी नृत्यात सामील करतात आणि लेंगी गातात. जसे की, धरती तोप अमर नईये कोई, धरती तोप!! अमर व्हेगेरे एक चांदान सुरिया, नवलाख तारा ओरे साथ चले, संगात चले, धरती तोप !! याचा भावार्थ असा की, या पृथ्वीच्या पाठीवर कोणीही अमर नाही. आपण सर्व त्या एकाच मृत्यू पथाचे वाटसरू आहोत म्हणून तुम्ही मृतांबद्दल दुःख करू नका, या होळी खेळा. चंद्र आणि सुर्य आपल्या कतृत्वाने अमर झाले आहे. कारण नवलक्ष तारे त्यांच्या पाठीशी आहेत. आपण पुर्वजांच्या परंपरेचे अनुसरण करू या, तुम्ही शोक करू नका, दुःख करू नका या होळी खेळूया.
सामुहिक श्रद्धांजली ही बंजारा समाजातील प्रथा आजच्या जीवनासाठी अभिनव आहे. त्याप्रमाणे त्यांच्या ऐक्य प्रतिमेला पोषकही आहे. वर्षभरात मृत्यू पावलेल्या प्रत्येक विवाहित व्यक्तीच्या घरी हे लोक याचप्रमाणे शोक व्यक्त करण्यासाठी जातात. त्यात गरीब, श्रीमंत असा भेदभाव बंजारा समाजामध्ये अजूनही पहावयास मिळत नाही. फालगुनी पोर्णिमेच्या दिवशी सर्व हिंदू होळीचे दहन करतात. परंतू बंजारा समाजाची होळी फालगुन कृष्ण प्रतिपदेच्या दिवशी दहन केली जाते. ती ही सुर्योदयापुर्वी. त्याचे असे की, फालगुनी पोर्णिमेच्या दिवशी पाल नावाचा उल्सव करतात. ज्याच्या घरी बारसे असेल त्याच घरी फाल्गुन वद्य प्रतिपदेनंतर जन्मलेल्या सर्व मुलांचे बारसे बंजारा समाजात त्यानंतर येणार्या होळीच्या दिवशीच होते. सध्याच्या युगात तिथीनुसार वाढदिवस साजरा केला जात आहे. पण बंजारा समाजात धुंड ही एकाच वेळेस केली जाते. जन्मल्या नंतर दुसर्या दिवशी त्यामुळे खर्च कमी लागतो. न बोलावता सर्वजण या धुंड कार्यक्रमास येतात. सध्या तांड्यावर ठिकठिकाणी लेंगी गीतांचा उत्साह दिसून येत आहे.
बंजारा समाजात परंपरेनुसार होळीचा सण आजही तांड्यावर साजरा केला जातो. यामध्ये महिलाही मोठ्या संख्येने सहभागी होतात. लेंगी गीते गाऊन आनंदाने सहभागी होतात. ही परंपरा हजारो वर्षांपासून सुरूच असल्याचे येथील सामाजिक कार्यकर्ते आदर्श महाविद्यालयातील प्रा.डी.आर. पवार यांनी सांगितले.