

सेनगाव : सेनगाव तालुक्यातील भंडारी पाटी ते होलगिरा आणि खैरी घुमट या रस्त्याचे अपूर्ण राहिलेले काम तसेच रेंगाळलेल्या पुलाच्या बांधकामामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांचा संयम अखेर सुटला. मौजे भंडारी, भंडारी तांडा, हत्ता तांडा, खैरी, होलगिरा आणि बोरखेडी येथील संतप्त ग्रामस्थांनी मंगळवारी (दि.२५) सकाळी भंडारी पाटी येथे एकत्र येत जोरदार 'रास्ता रोको' आंदोलन केले. जवळपास दीड तास चाललेल्या या चक्काजाममुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्याची दुरवस्था झाली असून प्रशासनाचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत होते. याचाच निषेध म्हणून पंचक्रोशीतील नागरिक रस्त्यावर उतरले. या आंदोलनात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनाची तीव्रता पाहता सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता श्री.मोहोड साहेब यांनी तातडीने आंदोलनस्थळी धाव घेतली. संतप्त ग्रामस्थांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी नागरिकांच्या सर्व मागण्या रास्त असल्याचे मान्य केले.
त्यांनी आंदोलनकर्त्यांना 'संबंधित निष्काळजी कंत्राटदाराची निविदा तात्काळ रद्द करून नवीन कंत्राटदाराची नियुक्ती केली जाईल'. तसेच 'रस्त्याच्या दुरुस्तीचे काम उद्यापासूनच सुरू करून पुलाचे कामही पूर्ण केले जाईल', असे लेखी आश्वासन दिले. प्रशासनाने लेखी पत्र दिल्यानंतर ग्रामस्थांनी आपले आंदोलन मागे घेतले.आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी आंदोलनस्थळी तगडा पोलिस बंदोबस्त होता.