Hingoli News : सवड तलाव कोरडा पडण्याच्या मार्गावर; जनावरांच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर

पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा असल्याने उपलब्ध जलसाठाही संपुष्टात येण्याच्या मार्गावर
Hingoli News : सवड तलाव कोरडा पडण्याच्या मार्गावर; जनावरांच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर
Published on: 
Updated on: 

हिंगोली : हिंगोली तालुक्यातील सवड येथील तलावातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असून, तलाव कोरडा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यंदा पावसाचे प्रमाण कमी झाल्याने तलावात अपेक्षेपेक्षा कमी पाणीसाठा झाला होता. त्यातच परिसरातील शेतकरी पाण्याच्या मोटारी लावून तलावातील पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा करीत असल्याने उपलब्ध जलसाठाही संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. परिणामी, गावातील जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हिंगोली तालुक्यातील सवड गावापासून काही अंतरावर सुमारे ४२ हेक्टर क्षेत्रावर हा तलाव आहे. अनेक वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या या तलावात दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा जमा होतो. मात्र, यंदा पावसाचे प्रमाण नेहमीपेक्षा कमी राहिल्याने तलाव केवळ ५० टक्केच भरला होता. त्यातच आता परिसरातील शेतकरी पाण्याच्या मोटारींच्या साहाय्याने तलावातील पाण्याचा उपसा करून शेतीसाठी वापर करीत आहेत. त्यामुळे तलावातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे.

विशेष म्हणजे, शासनाच्या निर्देशानुसार तलावातील पाणी जनावरांच्या पिण्यासाठी राखीव ठेवणे अपेक्षित आहे. मात्र, या निर्देशांकडे दुर्लक्ष करून काही शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात पाणी उपसा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. सध्याच्या स्थितीत तलावात केवळ २० टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती आहे. पाण्याचा उपसा असाच सुरू राहिल्यास काही दिवसांतच तलाव कोरडा पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे गावातील जनावरांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होणेही कठीण होऊ शकते.

प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी

तलावातील उपलब्ध पाणीसाठा जनावरांसाठी राखीव ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या गंभीर बाबीची तातडीने दखल घ्यावी. संबंधित विभागाला आवश्यक सूचना देऊन तलावातून मोटारींच्या साहाय्याने होणारा अनधिकृत पाणीउपसा थांबवावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप न केल्यास आगामी काळात जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.