

नर्सी नामदेव : पांडुरंगाचे परम भक्त आणि थोर राष्ट्रीय संत श्री नामदेव महाराज यांच्या ७५५ व्या जयंतीनिमित्त त्यांचे जन्मस्थान श्री क्षेत्र नर्सी नामदेव येथे २ नोव्हेंबर रोजी हजारो भाविकांच्या उपस्थितीत भव्य दीपोत्सव आणि भक्तिमय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
कार्तिकी प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी पहाटे ६:३८ वाजता मंदिर परिसर आणि घाट भागात हजारो पणत्या प्रज्वलित करून जन्मोत्सव सोहळ्याची सुरुवात झाली. यावेळी 'विठ्ठल-विठ्ठल' जयघोषात परिसर दुमदुमून गेला.
पहाटे ५ वाजता संस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांनी सपत्नीक श्री संत नामदेव महाराजांच्या वस्त्रसमाधीची महापूजा केली. यावेळी सचिव द्वारकादास सारडा, उपाध्यक्ष भिकाजी कीर्तनकार, रमेश महाराज मगर, मनोज आखरे, भागवत सोळंके, संतोष टेकाळे आदींसह जिल्हा व राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
जयंतीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन २८ ऑक्टोबरपासून करण्यात आले असून याची सांगता ३ नोव्हेंबर रोजी काल्याच्या कीर्तनाने होणार आहे. दिवसभर अभिषेक, आरती, भजन, कीर्तन, प्रवचन यांसह धार्मिक कार्यक्रम पार पडले. भाविकांच्या मोठ्या गर्दीची सुरळीत व्यवस्था ठेवण्यासाठी स्वतंत्र दर्शनरांग आणि मंडप उभारण्यात आला होता. सर्व भाविकांसाठी फराळाचीही व्यवस्था करण्यात आली होती. मंदिरावर आकर्षक रोषणाई, गाभाऱ्यात फुलांची सजावट, रांगोळी तसेच भव्य आतषबाजीमुळे मंदिर परिसर उजळून निघाला आणि जन्मोत्सव सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला.