जवळाबाजार, पुढारी वृत्तसेवा : विधानसभा निवडणुकीचा बिगुल येत्या दोन तीन दिवसांत वाजण्याची शक्यता असताना जवळाबाजार ग्रामपंचायतीतील काँग्रेसच्या ९ सदस्यांनी आपल्या पदाचा राजीनामा आज (दि.१४ ) दिला. ग्रामविकास अधिकार गजानन डुकरे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द करण्यात आला. त्यामुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
ग्रामपंचायत मध्ये एकूण १७ सदस्य आहेत. यामध्ये शिवसेना व भाजप व राष्ट्रवादी ८ सदस्य आणि काँग्रेसचे ९ सदस्य आहेत. यामध्ये नंदकिशोर बाहेती, फैसल पटेल, अविनाश मुळे, शे महजबीन खदीर, सीमा बेगम शफी कुरेशी, वर्षा दावलबाजे, विकास पांडववीर, वाजिदराज, शितल घोडेकर या काँग्रेसच्या सदस्यांनी राजीनामा दिला.
मागील चार दिवसांपासून जवळाबाजार येथे गोपनीय बैठक आयोजित करण्यात येत होती. आता मात्र राजकिय भुकंप करायचा पण तडजोड करायची नाही, आणि राजीनामा द्यायचा, अशी चर्चा सुरू होती. अखेर काँग्रेसच्या ९ सदस्यांनी आपले पदांचे राजीनामे दिले. सामान्य नागरिकांचे प्रश्न आणि विकामकामे मार्गी लागत नसल्याच्या कारणातून त्यांनी राजीनामे दिल्याचे सांगितले जात आहे.