Aundha Nagnath Temple | औंढा नागनाथ : कमान ते नागनाथ मंदिर उत्तर प्रवेशद्वार मार्गाच्या दुरुस्तीला गती?

आमदार संतोष बांगर यांची प्रत्यक्ष पाहणी; नव्या आराखड्याचे आदेश
Santosh Bangar Aundha Visit
Santosh Bangar Aundha VisitPudhari
Published on
Updated on

Aundha Nagnath Temple Road Repair

औंढा नागनाथ : औंढा नागनाथ शहरातील हिंगोली रोडवरील हेडगेवार चौक ते आठवडी बाजार, तसेच कमान ते श्री नागनाथ मंदिराच्या मुख्य उत्तर प्रवेशद्वाराकडे जाणाऱ्या प्रमुख मार्गाच्या दुरवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आमदार संतोष बांगर यांनी या मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली आणि रस्त्याच्या विकासासाठी नव्याने आराखडा तयार करून शासनाकडे सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले.

पावसाळ्यात या मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचणे, अपुरी जलनिस्सारण व्यवस्था आणि वाढती वाहतूक यामुळे नागरिकांसह मंदिरात येणाऱ्या भाविकांना अनेक वर्षांपासून मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या समस्येबाबत वारंवार वृत्तपत्रांमधून बातम्या प्रसिद्ध होऊनही स्थानिक प्रशासनाकडून अपेक्षित कार्यवाही झाली नसल्याची नाराजी नागरिकांनी व्यक्त केली.

या रस्त्याच्या विकासासाठी तत्कालीन नगराध्यक्ष दिपाली शरद पाटील यांच्या कार्यकाळात ६७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता. मात्र, रस्त्याची अंतिम रुंदी निश्चित न झाल्याने काम सुरूच होऊ शकले नाही. परिणामी, मंजूर निधी गेल्या सात वर्षांपासून नगरपंचायतीकडेच पडून आहे.

Santosh Bangar Aundha Visit
Aundha Nagnath Temple | औंढा नागनाथ मंदिराच्या सर्वांगीण विकासाला गती; १८२ कोटींच्या आराखड्यास उच्चाधिकार समितीची मंजुरी

पाहणीदरम्यान रस्त्याची सद्यस्थिती आणि भविष्यातील वाहतुकीचा वाढता ताण लक्षात घेता सध्याचा निधी अपुरा असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे सुमारे २ कोटी २५ लाख रुपयांचा सुधारित आराखडा तयार करून शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश आमदार बांगर यांनी अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी रस्त्यालगत झालेल्या अतिक्रमणाचाही आढावा घेण्यात आला. व्यापारी, स्थानिक नागरिक आणि प्रशासन यांच्याशी चर्चा करून रस्त्याची अंतिम रुंदी निश्चित करण्यात येणार असल्याचे आमदार बांगर यांनी सांगितले. मात्र, अतिक्रमण हटविणे हे प्रशासनासमोरील मोठे आव्हान ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या रस्त्याच्या भूसंपादनासंदर्भातील वाद औरंगाबाद खंडपीठापर्यंत गेला होता. त्यानंतर याचिकाकर्ते, नागनाथ संस्थान आणि शासन यांच्यात तडजोड झाल्याचे सांगितले जाते. या तडजोडीत रस्त्याच्या रुंदीबाबतही तरतूद करण्यात आली होती. मात्र, अंमलबजावणीच्या टप्प्यावर मतभेद निर्माण झाल्याने काम रखडले. तसेच रस्त्यासाठी दान करण्यात आलेल्या जमिनीवर झालेल्या अतिक्रमणामुळेही विकासकामात अडथळे निर्माण झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. न्यायालयीन आदेश आणि अधिकृत नोंदींची अंमलबजावणी करून रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी त्यांनी केली.

Santosh Bangar Aundha Visit
Aundha Nagnath Water Supply | बारा दिवसांपासून औंढा नागनाथमध्ये पाणीपुरवठा ठप्प; नगरपंचायतीच्या कारभारावर नाराजी

पाहणीवेळी मुख्याधिकारी गणेश गांजरे, नगरपंचायत अभियंता वसंत मुळे, नगराध्यक्ष कपील खंदारे, उपनगराध्यक्ष मनोज काळे, साहेबराव देशमुख, अनिल देशमुख, राहुल दंतवार तसेच संबंधित अधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

दरम्यान, या मार्गावरील पाणी साचणे, अतिक्रमण आणि रखडलेली विकासकामे यामुळे नागरिकांची गैरसोय दिवसेंदिवस वाढत आहे. नव्या आराखड्याला मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला गती मिळेल आणि श्री नागनाथ मंदिराकडे जाणारा हा प्रमुख मार्ग नागरिक व भाविकांसाठी अधिक सुरक्षित, प्रशस्त आणि सोयीस्कर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी घेतले श्री नागेश्वराचे दर्शन

छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी श्री क्षेत्र औंढा नागनाथ येथे भेट देऊन बारा ज्योतिर्लिंगांपैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री नागेश्वराचे विधिवत दर्शन घेत पूजा-अर्चा केली.

यावेळी श्री नागनाथ मंदिर संस्थानच्या वतीने विभागीय आयुक्तांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. मंदिर संस्थानचे अध्यक्ष वैजनाथ पवार आणि सचिव सुरेंद्र डफळे यांनी त्यांचे स्वागत केले.

Santosh Bangar Aundha Visit
Aundha Nagnath Morcha | औंढा नागनाथ येथे बौद्ध समाजाचा मोर्चा; जनगणनेत अनुसूचित जातीतील नोंद व उपवर्गीकरण रद्द करण्याची मागणी

दर्शनानंतर विभागीय आयुक्तांनी मंदिर परिसराची पाहणी करून सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी श्री क्षेत्र नागेश्वर मंदिर बाह्य विकास आराखड्याअंतर्गत सुरू असलेल्या विविध विकासकामांची सविस्तर माहिती त्यांना दिली.

यावेळी उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार हरीश गाडे, मंदिर संस्थानचे पदाधिकारी, कर्मचारी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news