

वसमत : शहरातील विविध भागांतील खराब रस्ते, खड्डे व वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या डिव्हायडरच्या समस्यांची पाहणी सोमवारी आमदार राजू नवघरे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत केली.
नागरिकांकडून वारंवार तक्रारी येत असल्याने आ. नवघरेंनी प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. प्रसाद मंगल कार्यालय परिसरातील कॅनल जवळील रस्ता पूर्णपणे खराब झाल्याची बाब आमदारांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी जाऊन रस्त्याची स्थिती पाहिली. तसेच दादरा ब्रिज जवळील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पडलेले खड्डे व साईटच्या बाजूने निर्माण झालेल्या खोल खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला असल्याचेही त्यांनी पाहिले.
यावेळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्मारकाजवळ रस्त्यावर पडलेले खडे तसेच रस्त्याच्या मधोमध उभे करण्यात आलेले डिव्हायडर यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले. या ठिकाणी त्वरित दुरुस्ती करून वाहतूक सुरळीत करण्याच्या सूचना आमदारांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
पुढे मयूर बार परिसरापर्यंत संपूर्ण रस्त्याची पाहणी करून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. आमदार नवघरे यांनी अधिकाऱ्यांना सांगितले की, शहरातील रस्त्यांमुळे नागरिकांना त्रास होऊ नये. खराब रस्ते व खड्डे तातडीने बुजवून रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी तसेच भविष्यात अशा समस्या निर्माण होणार नाहीत यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात. यावेळी नगराध्यक्ष प्रतिनिधी कन्हैय्या बाहेती, नगरसेवक, संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.