

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा: लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशामुळे हौसले बुलंद झालेल्या महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांची चंगळ झाल्याचे रविवारी पक्षनिरीक्षकांकडून घेण्यात आलेल्या इच्छुकांच्या मुलाखतीवरून समोर आले आहे. हिंगोली विधानसभा मतदार संघातून तब्बल आठ जणांनी पक्षनिरीक्षक माजी मंत्री अनिल पटेल यांच्याकडे मुलाखत दिली. तर कळमनुरी व वसमत विधानसभा मतदार संघातूनही प्रत्येकी पाच जणांनी उमेदवारीसाठी दावेदारी केली आहे.
विधानसभा निवडणुक महिन्यावर येऊन ठेपल्याने कठीसमधील अंतर्गत हालचाली वाढल्या आहेत. इच्छुकांच्या मुलाखती घेण्यासाठी रविवारी पक्षाने पाठविलेले पक्षनिरीक्षक माजी मंत्री अनिल पटेल व जिल्हाध्यक्ष दिलीप देसाई यांच्या उपस्थितीत एका खाजगी मंगल कार्यालयात मुलाखतीचा सोपस्कार पार पडला. हिंगोली विधानसभा मतदार संघातून प्रबळ दावेदार मानले जाणारे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्यासह मधुकर जामठीकर, विनायक देशमुख, प्रकाश थोरात, सुधीर आप्पा सराफ, राजेश भोसले, अॅड. सचिन नाईक, शामराव जगताप यांनी मुलाखत दिली.
तर कळमनुरी विधानसभा मतदार संघातून जिल्हाध्यक्ष दिलीप देसाई, जक्की कुरेशी, डॉ. सतीश पाचपुते, अॅड. सचिन नाईक व ममता बेंबळे यांनी मुलाखत दिली. वसमत विधानसभा मतदार संघातून काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष मुनीर पटेल, डॉ. मारोती क्यातमवार, प्रशांत गायकवाड, राजाराम खराटे व प्रिती जैस्वाल यांनी मुलाखत दिली.
महाविकास आघाडीमध्ये केवळ हिंगोली विधानसभा मतदार संघच काँग्रेसच्या वाट्याला येणार असल्याचे स्पष्ट संकेत असताना कळमनुरी व वसमत विधानसभा मतदार संघातूनही इच्छुकांनी मुलाखती दिल्याने महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता व्यक्त होऊ लागला आहे. दस्तरखुद्द जिल्हाध्यक्ष दिलीप देसाई यांनी कळमनुरी विधानसभा मतदार संघातून उमेदवारी मागितली आहे. मागील अनेक वर्षापासून दिलीप देसाई यांना आमदारकीची निवडणुक लढविण्याची इच्छा असल्याने होऊ घातलेल्या निवडणुकीत देसाई यांचे स्वप्न पुर्ण होईल का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.