

हिंगोली : मराठी भाषेचा केवळ प्रशासकीय व्यवहारापुरता वापर न ठेवता तिचे जतन, संवर्धन आणि साहित्यिक चळवळीला संस्थात्मक बळ देण्याच्या दिशेने हिंगोलीने राज्यात नवा पायंडा पाडला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात राज्यातील पहिले स्वतंत्र मराठी भाषा कार्यालय सुरू करण्यात आले असून, जिल्ह्यात ‘पुस्तकाचे गाव’ विकसित करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णयही घेण्यात आला आहे. उद्योग, गुंतवणूक, सेवा व मराठी भाषा विभागाचे मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. २७) या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील साहित्यिक, लेखक आणि वाचनसंस्कृतीला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
यावेळी बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन केंद्राचे अध्यक्ष हेमंत पाटील, आमदार संतोष बांगर, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, पोलिस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा, उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड आणि मराठी भाषा विभागाचे सहायक संचालक शशिकांत देवरे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या या स्वतंत्र कार्यालयासाठी विभागाच्या अधिकाऱ्याची नियुक्तीही करण्यात आली आहे. मराठी भाषेच्या विकासासाठी शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि साहित्यविषयक संधींचा लाभ जिल्ह्यातील साहित्यिकांनी या कार्यालयाच्या माध्यमातून घ्यावा, असे आवाहन मंत्री सामंत यांनी केले.
याप्रसंगी साहित्यिक खंडेराव सरनायक, संजय टाकळगव्हाणकर, बबन शिंदे, विजय गुंडेकर, रतन आडे, दिलीप धामणे, राजकुमार मोरगे, गोडाती काळे, सिंधुताई दहिफळे, राधिका देशमुख आणि संगीता चौधरी यांनी साहित्य संवर्धन, साहित्यिकांच्या अडचणी आणि विविध मागण्या मंत्र्यांसमोर मांडल्या.
बोलीभाषांना मिळणार शब्दकोशाचे बळ
राज्यातील विविध बोलीभाषांमधील शब्दवैभव लोप पावू नये, यासाठी त्यांचे दस्तऐवजीकरण करून स्वतंत्र शब्दकोश तयार करण्यात येणार आहेत. तसेच स्थानिक साहित्यिकांची पुस्तके खरेदी करून ती शाळा आणि महाविद्यालयांपर्यंत पोहोचविण्याचा उपक्रमही राबविण्यात येणार असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.
गावागावांत रुजणार वाचनसंस्कृती
जिल्ह्यात ‘पुस्तकाचे गाव’ उभारण्यासाठी योग्य गावाची निवड करण्यात येणार आहे. नागरिकांनी यासाठी गाव सुचवावे, असे आवाहन करण्यात आले. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या पुढाकारातून लवकरच वाचन कक्षही सुरू होणार असून, हा उपक्रम राज्यातील अन्य जिल्ह्यांसाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला.