

सेनगाव नगरपंचायतीच्या घरकुल विभागात शुक्रवारी (दि. ३० जानेवारी) सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीत प्रधानमंत्री रमाई आवास योजना, शबरी आवास योजना तसेच इतर घरकुल योजनांच्या महत्त्वाच्या संचिका व लेआउट फाइल्स यासह इतर महत्त्वाचे दस्तावेज जळून खाक झाल्याने प्रथमदर्शनी दिसून आले. यामध्ये मोठे नुकसान झाले असल्याचे नागरिकातून बोलले जात आहे.
नगरपंचायतीच्या घरकुल विभागात विविध घरकुल योजनांसाठी स्वतंत्र कक्ष असून, याच कक्षात ठेवलेल्या कागदपत्रांना आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच नगरपंचायतीचे कर्मचारी व स्वच्छता कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत शर्तीचे प्रयत्न करून आग विझवण्यास सुरुवात केली. काही वेळातच आग आटोक्यात आणण्यात यश आले. दरम्यान अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते; मात्र त्यांच्या येण्यापूर्वीच आग नियंत्रणात आली होती. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्यानंतर ती तात्काळ विझवण्यात आल्याने मोठा अनर्थ टळल्याची चर्चा नगरपंचायत व शहरात सुरू आहे. सेनगाव नगरपंचायतीच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच अशा प्रकारची आग लागण्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
या घटनेबाबत सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रभारी मुख्याधिकारी योगेश मीना यांनी सेनगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पुढील तपास सुरू आहे. आगीत नेमके किती नुकसान झाले, कोणत्या संचिका पूर्णतः जळाल्या याचा पंचनामा करून सविस्तर अहवाल तयार केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
घटनेची सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास कारवाई निश्चित: योगेश मीना
आज सेनगाव नगरपंचायत मधील घरकुल विभागाला अचानक आग लागल्याची घटना घडली असून ही आग प्रथम दर्शनी शॉट सर्किट मुळे लागली असल्याचा अंदाज दिसतोय परंतु या घटनेचा गांभीर्य लक्षात घेता संपूर्ण घटनेची पोलीस प्रशासनासह विद्युत वितरण विभागा अंतर्गत सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून त्यामध्ये कोणीही दोषी आढळल्यास कदापि गये केली जाणार नाही त्यावर निश्चित कारवाई होईल अशी गवाही सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रभारी मुख्याधिकारी योगेश मीना यांनी दिली.