

Kalamnuri Sindagi Leopard Attack
सिंदगी : कळमनुरी तालुक्यातील सिंदगी शिवारात बिबट्याने अक्षरशः धुमाकूळ घातला असून, अवघ्या दोन दिवसांत दोन शेळ्या व एका कालवडीचा फडशा पाडला. त्यामुळे शेतकरी व पशुपालकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याचा वावर वारंवार दिसून येत असतानाही वनविभागाकडून ठोस उपाययोजना कधी होणार? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
सिंदगी शिवारातील ज्ञानेश्वर धनवे यांच्या आखाड्यावर बांधलेल्या शेळीवर बिबट्याने हल्ला करून तिला ठार केले. याच ठिकाणी असलेल्या पाळीव कुत्र्यावरही बिबट्याने हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच हरिभाऊ मगर यांच्या शेतातील आखाड्यावर बांधलेल्या कालवडीवरही बिबट्याने हल्ला करून तिचा फडशा पाडला. सलग घडलेल्या या घटनांमुळे पशुपालकांचे मोठे नुकसान झाले आहे.
शिवारात बिबट्याचा वावर असल्याने शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतात जाणेही धोकादायक ठरत आहे. जनावरे बांधलेल्या आखाड्यांमध्येही बिबट्या पोहोचत असल्याने पशुपालकांमध्ये भीती वाढली आहे. आणखी एखादी अप्रिय घटना घडल्यानंतरच वनविभाग जागा होणार का? असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
वनविभागाने केवळ पंचनामा किंवा पाहणीपुरती कार्यवाही न करता बिबट्याचा ठावठिकाणा शोधून तातडीने पिंजरा लावावा आणि त्याचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी शेतकरी व पशुपालकांनी केली आहे. बिबट्यामुळे मनुष्यवस्तीलाही धोका निर्माण होण्यापूर्वी वनविभागाने ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.