हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : कळमनुरी विधानसभा मतदार संघात ठाकरे सेनेचा उमेदवार निवडून यावा या दृष्टीने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विशेष लक्ष घातल्याचे समोर आले आहे. रविवारी दुपारी मातोश्रीवर कळमनुरी विधानसभा मतदार संघातील इच्छुक उमेदवारांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. बैठकीत शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांना कसे रोखायचे यावर चर्चा झाली. विशेष म्हणजे इच्छुकांपैकी सर्वांकडून जो कोणी उमेदवार दिला जाईल त्याचे काम एकदिलाने करण्याचे लिहून घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
कळमनुरीतील शिंदे सेनेचे विद्यमान आमदार संतोष बांगर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याचे ठाकरेंच्या जिव्हारी लागल्याने त्यांनी कळमनुरी विधानसभा मतदार संघावर लक्ष केंद्रीत केल्याचे बोलले जात आहे आमदार संतोष बांगर यांनी निधीसह संघटन बांधणीच्या बळावर शिंदे से नेला पाठबळ मिळवून दिले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीसह ठाकरे सेनेला आ. बांगर यांचा पराभव कसा करता येईल यावर चिंतन करावे लागत आहे. त्यामुळे रविवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कळमनुरी विधानसभा मतदार संघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा केली.
यावेळी शिवसेनेचे सचिव माजी खासदार विनायक राऊत, संपर्क प्रमुख बबनराव थोरात, आमदार मिलिंद नार्वेकर, माजी आमदार डॉ. संतोष टारफे, जिल्हाप्रमुख गोपू पाटील, संदेश देशमुख, जिल्हा संघटक बाळासाहेब मगर, अजित मगर, राजेश पाटील गोरेगावकर, शेतकरी सेनेचे प्रदेश संघटक वसीम देशमुख, डॉ. रमेश मस्के, डी. के. दुर्गे, उद्धव गायकवाड यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी कळमनुरी विधानसभा मतदार संघाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. कळमनुरीतून माजी आमदार डॉ. संतोष टारफे, गोपू पाटील, बाळासाहेब मगर, अजित मगर हे चौघेजण इच्छुक आहेत. या इच्छुकांकडून पक्षप्रमुखांनी जो कोणी उमेदवार दिला जाईल त्याचे काम एक दिलाने करण्यात येईल असे देखील लिहून घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.
मातोश्रीवर बैठक पार पडल्यानंतर विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनीही पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून आवश्यक त्या सूचना केल्या. तसेच ११ ऑक्टोबर रोजी हिंगोली जिल्ह्यात प्रत्यक्ष येऊन पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार असल्याचे दानवे यांनी सांगितले. एकूणच ठाकरे सेनेने कळमनुरी विधानसभा मतदार संघावर विशेष लक्ष केंद्रीत केल्याचे समोर आले आहे.