औंढा नागनाथ : येथे महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून अनेक बाबतीत दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. अनेक वेळा दुरुस्तीच्या नावाखाली वीजप्रवाह पुरवठा खंडित करणे तसेच झालेल्या बिघाडाच्या ठिकाणी काम करण्यास विलंब करणे, कोणाचेही फोन न उचलणे, छोट्या मोठ्या बिघाडासाठीही उपलब्ध न होणे. असा मनमानी कारभार चालू आहे.
अनेक कामे खाजगी कामगारांमार्फत करण्यात येत आहेत. खाजगी कामगारांना जुजबी प्रशिक्षण देऊन त्यांना या कामात सांभाळून घेण्यात आल्याचे दिसून येते. मात्र हे कर्मचारी एखाद्या सराईत कर्मचाऱ्यांसारखे विद्युत वितरणाचे काम करून घेत आहेत. औंढा नागनाथ येथे अनेक ठिकाणी वीज प्रवाहाच्या तारांचे अक्षरश: जाळे पसरल्याचे दिसून येत आहे. तसेच अनेक विद्युत खांब पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. या सर्व परिस्थितीची योग्य दखल महावितरणने घ्यावी अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.