

सेनगाव: तालुक्यातील अवैध गौण खनिज उपसा आणि वाहतुकीविरोधात महसूल प्रशासनाने आपली मोहीम तीव्र केली आहे. शुक्रवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास तांदूळवाडी शिवारात केलेल्या एका धडक कारवाईत, वाळूची चोरटी वाहतूक करणारे तीन टिप्पर पकडण्यात आले. या कारवाईत वाहने आणि वाळूसह सुमारे ४० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या या कारवाईने वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
मागील काही काळापासून सेनगाव तालुक्यातील अनेक भागांतून, विशेषतः रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे येत होत्या. तस्कर रात्री वाळूचा उपसा करून, पहाटेच्या वेळी भरधाव वेगाने वाहतूक करत असत. यामुळे रस्त्यांवरून मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला होता. या वाढत्या तक्रारी आणि धोक्याची गंभीर दखल घेत प्रशासनाने कारवाईचे नियोजन केले होते.
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता आणि उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली, तहसीलदार सखाराम मांडवगडे यांनी एक विशेष पथक स्थापन केले होते. पथकाने तांदूळवाडी शिवार, सेनगाव याठीकाणी धाड टाकण्यात आली. यावेळी तीनही टिप्पर (किंमत अंदाजे ३६ लाख रुपये) आणि त्यातील वाळू (किंमत अंदाजे ४ लाख रुपये) असा एकूण ४० लाखांचा मुद्देमाल जप्त केला. पथकाने वाहनांची तपासणी सुरू केली असता, वाळूने भरलेले तीन टिप्पर आढळून आले. कागदपत्रांची तपासणी केली असता ती अवैध वाहतूक असल्याचे स्पष्ट झाले. या पथकामध्ये केलेल्या कारवाईत नायब तहसीलदार देवराव कारगुडे, मंडळ अधिकारी के. एन. पोटे, गजानन पारीसकर यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
सेनगाव तालुक्यात महसूल प्रशासनाने अवैध वाळू वाहतुकीविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. एकापाठोपाठ होणाऱ्या या कारवायांमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यापुढेही अशी कारवाई सुरूच राहणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले असून, नागरिकांनी अवैध वाहतुकीबाबत माहिती देण्याचे आवाहन केले आहे.