

हिंगोली : पुढारी वृत्तसेवा
सेनगाव हिंगोली सेनगाव राज्य महामार्गवरील तळणी ते सेनगाव दरम्यान दिनांक 10 ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सावरखेडा ता. सेनगाव जि. हिंगोली येथील पती-पत्नी घोटा देवी येथील देवीचे दर्शन करून गावाकडे परतत होते. यावेळी तळणी फाट्यानजीक हॉटेल जवळ उभ्या असलेल्या आयशरला दुचाकीची जबर धडक बसली. या भीषण अपघातात पती-पत्नी दोघे जागीच ठार झाले. या घटनेमुळे सावरखेडा गावावर शोककळा पसरली आहे.
सेनगाव तालुक्यातील सावरखेडा ता. सेनगाव जी.हिंगोली येथील रहिवासी गणेश शंकर मुंढे व त्यांची पत्नी सविता गणेश मुंढे हे दोघे पती-पत्नी घोटा देवी येथील प्रसिद्ध देवीच्या दर्शनानंतर दुचाकीवरून परत गावी सावरखेडा जात होते. यावेळी 10 ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास तळणी व सेनगाव दरम्यान हॉटेलजवळ स्वस्त धान्याच्या नादुरूस्त उभ्या असलेल्या आयशर ट्रक क्रमांक एम. एच. 43,2137 ला धडकला. यामध्ये दोघे पती-पत्नी जागीच ठार झाले.
ही घटना सेनगाव शहरात घडली असून, घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष तांबे, पोलीस उपनिरीक्षक शिवानंद स्वामी, शहर बीट अंमलदार सुभाष चव्हाण यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन दोघांना सेनगाव ग्रामीण रुग्णालयात येऊन दाखल केले. परंतु दोघे पती-पत्नी जागेवरच गतप्राण झाल्याने सावरखेडा गावावर शोककळा पसरली. मृत गणेश मुंढे व पत्नी सविता मुंढे या कुटुंबांना एक मुलगा व मुलगी असे दोन अपत्य असून मुलगा नाशिक येथे शिक्षण घेत असल्याची माहिती समोर आली आहे.