Hingoli Crime : वसमतमध्ये युवकाचा दगडाने ठेचून खून

एरिगेशन कॅम्प परिसरातील घटना
Hingoli Crime News
वसमतमध्ये युवकाचा दगडाने ठेचून खून
Published on
Updated on

वसमत : वसमत शहरातील ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पाठीमागील एरिगेशन कॅम्प परिसरातील जुन्या रेस्ट हाऊसमध्ये एका युवकाचा दगडाने ठेचून खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी वसमत शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून शहरात खळबळ उडाली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार अभिजीत रत्नाकर शहाणे (वय 33, रा. सुवर्णकार कॉलनी, मालेगाव रोड, वसमत) असे मृत युवकाचे नाव आहे. याबाबत त्यांचे नातेवाईक संजय प्रभाकर टाक यांनी फिर्याद दिली आहे.

गुन्ह्याच्या प्राथमिक माहितीनुसार, गुरूवारी (दि.17) दुपारी 12.30 ते शुक्रवारी (दि.18) दुपारी 2.35 या कालावधीत एरिगेशन कॅम्पमधील जुन्या पडीत रेस्ट हाऊसच्या खोलीत अज्ञात व्यक्तीने अभिजीत शहाणे यांच्या डोक्यात दगड घालून त्यांची हत्या केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. याप्रकरणी शुक्रवारी (दि.18) सायंकाळी 7.05 वाजता गुन्ह्याची नोंद करण्यात आली. आरोपी अद्याप फरार असून पोलीसांकडून त्याचा शोध सुरू आहे.

घटनेची गंभीर दखल घेत हिंगोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, अपर पोलीस अधीक्षक मीना, उपविभागीय पोलीस अधिकारी केंद्रे, पोलीस निरीक्षक वाघ, पोलीस निरीक्षक भोसले तसेच सपोनि शंकर डेडवाल यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तपास सपोनि शंकर डेडवाल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news