

Hingoli Kayadhu River Drowning
हिंगोली : तालुक्यातील घोटा शिवारात कयाधू नदीच्या पात्रात बैलजोडी धुण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा पाण्यात बुडून करुण अंत झाल्याची घटना रविवारी (दि.१२) घडली. दोघांवर शोकाकुल वातावरणात घोटा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे घोटा गावावर शोककळा पसरली आहे.
घोटा येथील कृष्णा बालाजी अटक (वय 16) व त्याचा मित्र गणेश उर्फ बंटी अर्जुन पावडे (वय 16) हे दोघे रविवारी दुपारी बैलजोडी धुण्यासाठी तसेच शेळ्या चारण्यासाठी कयाधू नदीच्या परिसरात गेले होते. दुपारच्या सुमारे कयाधू नदीच्या पात्रात खोल खड्डा असलेल्या भागातील पाण्यात दोघेही उतरले. यावेळी दोघांनाही पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे दोघेही पाण्यात बुडाले. मात्र पाण्यावर येण्याच्या प्रयत्नात ते खड्ड्यातील गाळात अधिकच फसत गेले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, सायंकाळी शेळ्या घरी आल्या अन् दोघेही घरी आले नसल्याने त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा शोध सुरु केला. यावेळी गावकऱ्यांनी कयाधू नदीच्या पात्रातील खड्ड्यात पाहणी केली असता दोघांचे मृतदेह गाळात फसल्याच्या स्थितीत आढळून आले. गावकऱ्यांनी दोघांचेही मृतदेह बाहेर काढल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी हंबरडा फोडले. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.
मृत कृष्णा हा नुकताच दहावी पास झाला होता. त्याने हिंगोली तालुक्यातील एका महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. त्याच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ असा परिवार आहे. तसेच मृत बंटी उर्फ गणेश याच्या पश्चात आई, वडील दोन भाऊ असा परिवार आहे. बंटी हा देखील नुकताच दहावीच्या परीक्षेत पास झाला होता.