हिंगोली : जिल्हयात पोलिस दलाचा दबदबा राखणारे पोलिस अधिक्षक जी. श्रीधर यांची पुणे येथे उपायुक्त शहर या ठिकाणी बदली झाली असून त्यांच्या बदलीचे आदेश बुधवारी (दि.7) काढण्यात आले आहेत. कायदा व सुव्यवस्थेसोबतच सामाजिक कार्यातही त्यांनी सहभाग नोंदविला आहे. हिंगोली जिल्हा पोलिस दलात दोन वर्षापुर्वी रूजू झालेल्या पोलिस अधिक्षक जी. श्रीधर यांनी अल्पावधितच आपल्या कार्याचा ठसा उमटविला होता. दर महिन्यात चोरी, जबरीचोरीचे गुन्हे उघड झाल्यानंतर त्यातील जप्त केलेला मुद्देमाल दर महिन्याच्या अखेरच्या दिवशी पोलिस ठाण्यात बोलावून सन्मानपुर्वक परत करण्याचा उपक्रम त्यांनी सुरु केला.
दोन वर्षाच्या काळात तब्बल ४ कोटी रुपयांचा मुद्देमाल तक्रारदारांना परत करण्यात आला. यामध्ये सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम, दुचाकी, चार चाकी वाहनांचा समावेश आहे. जिल्हयात कायदा व सुव्यवस्था रहावी यासाठी बिट मार्शल मार्फत गस्त सुरु केली. तसेच प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत अधिकारी व कर्मचाऱ्यांना गस्तीवर राहण्याचे आदेशही त्यांनी दिले होते. त्यामुळेच जबरी चोरी, एटीएम पळविण्याची घटना वेळीच रोखण्यात पोलिस दलास यश आले. अवैध व्यवसायावर त्यांनी अंकूश ठेऊन मटका, जुगार, अवैधदारु विक्रीवर त्यांच्या काळात कडक कारवाई करण्यात आली. कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या 45 समाजकंटकांवर तडीपारीची कारवाई केली
या शिवाय पोलिस दलाच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या भरोसा सेलमध्ये एक वर्षात तब्बल ३६० जोडप्यांचे समुपदेशन करून विभक्त होणारा संसार पुन्हा जुळविला आहे. तसेच पोलिस दलाच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजित केले तर वृक्षारोपनासाठीही त्यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या बदलीनंतर आता तुर्तास पोलिस अधिक्षक पदाचा पदभार अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांच्याकडे सोपविला जाणार आहे.