हिंगोली : शिंदे सेनेकडून उमेदवार बदलण्याच्या हालचाली; बाबुराव कदम कोहळीकरांना उमेदवारी?

बाबुराव कदम कोहळीकर
बाबुराव कदम कोहळीकर

हिंगोली : पुढारी वृत्‍तसेवा हिंगोली लोकसभा मतदारसंघातून शिंदे सेनेचा उमेदवार बदलण्याच्या युध्दपातळीवर हालचाली सुरु झाल्या असून, ऐनवेळी बाबुराव कदम कोहळीकर यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडणार असल्याचे विश्‍वसनीय वृत्त आहे. पुढील दोन दिवसांत याबाबत निर्णय होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

हिंगोली लोकसभेची जागा महायुतीमधून शिंदे सेनेला सोडल्यानंतर भाजप मधून नाराजीचा सुर उमटू लागला होता. त्यातच विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहिर केल्यावर नाराजी अधिकच तिव्र झाली. या संदर्भात भाजपच्या रविवारी झालेल्या बैठकीमध्ये विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना उमेदवारी नकोच असा सूर आळवला गेला. कमळ चालेल, धनुष्यबाणही चालेल पण हेमंत पाटील नको असे मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.

मागील पाच वर्षात विद्यमान खासदार पाटील यांनी विकास कामे केली नाहीत, मतदारांशी संपर्क ठेवला नसल्याचा आरोप भाजपच्याच पदाधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना केला आहे. त्यामुळे शिंदेसेनेवर उमेदवार बदलण्यासाठी मोठा दबाव येऊ लागला आहे. त्यामुळे आता शिंदेसेनेकडून उमेदवार बदलण्याच्या हलचाली युध्दपातळीवर सुरु झाल्या आहेत.

सध्या शिंदे सेनेकडून नांदेड जिल्हा प्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांचे नांव आघाडीवर आहे. हदगाव विधानसभेत अपक्ष म्हणून निवडणुक लढविलेले कोहळीकर दुसऱ्या स्थानावर होते. हिंगोली लोकसभेसाठी शिंदेसेनेकडून उमेदवारीची माळ त्यांच्या गळ्यात पडणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

दुसरीकडे भाजपचे शिष्टमंडळ परभणी येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असून त्यांच्याकडे हिंगोलीची जागा भाजपला सोडण्याची मागणी केली जाणार आहे. त्यामुळे आता पुढील दोन दिवसांत होणाऱ्या राजकिय घडामोडीकडे हिंगोली लोकसभा मतदार संघाचे लक्ष लागले आहे.

या संदर्भात बाबुराव कदम कोहळीकर यांच्याशी दुरध्वनीवरून संपर्क साधला असता, आम्ही खासदार हेमंत पाटील यांची उमेदवारी कायम राहण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. मात्र पक्षाने दिलेले आदेश, पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडली जाईल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news