

Jeweller looted Hingoli
सेनगाव : तालुक्यातील कापडसिंगी ते रिसोड मार्गावर धानोरा शिवारात सराफा व्यापाऱ्याच्य दुचाकीला लाथ मारून पाडल्यानंतर तीन चोरट्यांनी त्यांच्याकडील सुमारे ७ लाख रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने असलेली बॅग पळविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाशीम जिल्ह्यातील लोणार येथील सराफा व्यापारी सुरेश कंधारकर यांचे कापडसिंगी येथे सोन्याचांदीचे दुकान आहे. शुक्रवारी (दि. ३०) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास भावाचा निरोप आल्यामुळे ते दुकानबंद करून दुचाकी वाहनावर कापडसिंगी येथून दुचाकी वाहनावर रिसोडकडे निघाले होते.
दरम्यान, कापडसिंगी पासून काही अंतरावर धनोरा शिवारात पाठीमागून दुचाकीवर येणाऱ्या तिघांनी त्यांना थांबण्याची सुचना केली. मात्र अनोळखी व्यक्ती पाहून ते थांबले नाही. त्यामुळे दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या दचाकीला लाथ मारून खाली पाडले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे सुरेश घाबरून गेले. त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ते रस्त्याच्या खाली जाऊन पडले. चोरट्यांपैकी एकाने त्यांना चाकूचा धाक दाखविला त्यांच्याकडील सोन्या चांदीचे दागिने असलेली बॅग ताब्यात घेतली अन तिघेही दुचाकीवर फरार झाले.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिक्षक निलाभ रोहन, अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना, गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले, सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, दीपक मस्के, जमादार सुभाष चव्हाण, जीवन मस्के, टी. के. वंजारे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
या प्रकरणात पोलिसांनी तातडीने तीन पथके स्थापन करून चोरट्यांच्या शोधात रवाना केली आहे शोधासाठी व्यापक शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक निरीक्षक रविकिरण खंदारे करीत असून, अद्याप आरोपी अटक झालेले नाहीत. भरदिवसा घडलेल्या या धाडसी लुटीमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.