हिंगोलीः दर्जेदार रस्त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध होणार !

Ram Shinde | विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांचा विश्वास, हत्ता-साखरा-तळणी-सिंदगी या राज्यमार्गाचे भूमीपूजन
Ram Shinde
हिंगोलीः राज्यमार्गाचे भूमीपूजनप्रसंगी बाेलताना विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे. Pudhari Photo
Published on
Updated on

हिंगोली : पुढारी वृत्तसेवा : हत्ता-साखरा-तळणी-सिंदगी या राज्य रस्त्याचे काम कमी वेळात पूर्ण करण्यात येणार असून हा रस्ता दर्जेदार होणार आहे. दर्जेदार रस्त्यामुळे कमी वेळात वाहतुकीची सुविधा उपलब्ध होणार असल्यामुळे येथे उत्पादित दूध, भाजीपाला, यासह इतर कृषी उत्पादनांना अधिकचा दर व उत्पादकाकडून ग्राहक, उपभोक्त्याला ताजा माल मिळण्याची सोय होणार आहे. यासोबतच शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी आज हत्ता येथील कार्यक्रमात केले.

सेनगाव तालुक्यातील हत्ता येथे आज हत्ता-साखरा-तळणी-सिंदगी या राज्य रस्त्याचे भूमीपूजन विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते आज कोनशिलेचे अनावरण करुन करण्यात आले. यावेळी आमदार तानाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर, माजी आमदार रामराव वडकुते, माजी आमदार गजानन घुगे उपस्थित होते.

पुढे बोलताना प्रा. शिंदे म्हणाले, या राज्यमार्गामुळे येथील दळणवळणाच्या सोयीसुविधांमध्ये वाढ होत असून, या रस्ता बांधकामामुळे गावाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण बदल घडून येणार आहे. हिंगोली - सेनगाव - रिसोड तसेच जिंतूर सेनगाव -रिसोड अशा पद्धतीने मराठवाडा विदर्भाला नव्या मार्गाने जोडले जाणार आहेत. छोटी गावे शहरांना आणि इतर गावांशी जोडल्यामुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात, असेही प्रा. शिंदे यांनी सांगितले. या रस्त्यामुळे स्थानिक पातळीवरच युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. बहुमतात असलेले सरकार असल्यामुळे गोरगरीब, शेतकरी, मध्यमवर्गीय कोणत्याही योजनांपासून वंचित राहणार नाहीत, अशी मुख्यमंत्र्यांनी भूमिका घेतली आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवजेंद्रसिंह राजे भोसले म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींच्या सर्व लोकांना सोबत घेत स्वराज्य स्थापनेसाठी प्रयत्न केले. त्यामुळे मराठी माणूस म्हणून आपण सर्व एक आहोत, हे लक्षात घेतले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता अहिल्यादेवी होळकर या दोघांनीही त्यांच्या राजवटीत जनतेच्या कामाला प्राधान्य दिले. त्याचप्रमाणे विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि आपण दोघेही या रस्ता भूमिपूजनाचे काम करत आहोत. या रस्त्यामुळे ग्रामीण भागात वाहतूक सुलभ होणार आहे. व्यापार आणि वाणिज्य वाढविण्यासाठी, आरोग्य सेवा आणि आपत्कालीन सेवा मिळविण्याच्या कालावधीत बचत होते. या राज्य मार्गामुळे गावाच्या विकासात आणि ग्रामीण जीवन सुधारण्यासाठी मोठे योगदान मिळणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले.

यावेळी आमदार तानाजी मुटकुळे म्हणाले की, या महत्त्वपूर्ण रस्ता कामाचे भूमिपूजन झाले असून, हिंगोली जिल्ह्यातील सुवर्णाक्षरात लिहण्यासारखा क्षण आहे. या भूमीपूजन कार्यक्रमास दोन राजघराण्यातील वंशज येथे आले आहेत. महाराष्ट्र हिताचे काम सुरू आहे. जिल्ह्यातील नरसी नामदेवपासून विविध गावांना जोडणाऱ्या रस्त्यांचे काम होणे आवश्यक आहे, असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले.

माजी आमदार रामराव वडकुते यांनी 200 कोटीच्या रस्ते भूमिपूजनाच्या निमित्ताने दोन राजे आले आहेत. दोघांचेही स्वागत करुन त्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त केले. तसेच हत्ता ते औंढा नागनाथ रस्त्यापर्यंतचे 40 किलोमीटरच्या कामास मंजुरी द्यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. या कार्यक्रमास परिसरातील पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news