हिंगोलीच्या सुपुत्राची अभिमानास्पद कामगिरी : पुष्यमित्र जोशीची राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी निवड

Pushyamitra Joshi | पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी दिल्लीत पुरस्कार प्रदान होणार
Pushyamitra Joshi
हिंगोलीच्या सुपुत्र पुष्यमित्र जोशीची राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी निवड झाली आहे.Pudhari Photo
Published on
Updated on

हिंगोली: पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील तरुण संशोधक, उत्कृष्ट वक्ता आणि धोरण सल्लागार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुष्यमित्र जोशीची भारत सरकारच्या प्रतिष्ठित राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी निवड झाली आहे. युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने हा पुरस्कार प्रदान केला जातो. या पुरस्कारामुळे हिंगोलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. (Pushyamitra Joshi)

राष्ट्रीय युवा पुरस्कार देशातील युवकांसाठी सर्वोच्च सन्मान मानला जातो. देशात १५ ते २९ वर्ष वयोगटात विज्ञान, समाजसेवा, नवोपक्रम, नेतृत्व, संशोधन आणि धोरण आदी क्षेत्रांमध्ये असाधारण कार्य करणाऱ्या युवा व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. पुष्यमित्र जोशीचे विज्ञान-तंत्रज्ञान, पर्यावरणीय धोरण, सामाजिक कार्य आणि सार्वजनिक प्रशासनातील मोलाचे योगदान लक्षात घेऊन त्याची निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथे आयोजित विशेष कार्यक्रमात प्रदान केला जाणार आहे.

पुष्यमित्र जोशी हा संशोधक, नवोपक्रमकर्ता, लेखक आणि धोरण सल्लागार म्हणून सुपरिचित आहे. त्याच्या विज्ञान आणि समाजसेवा यांचे एकत्रित संशोधनात्मक कार्य समाज परिवर्तनासाठी उपयुक्त ठरत आहे. त्याच्या तीन संशोधनांना भारत सरकारकडून पेटंट मान्यता मिळाली आहे. त्यानी आपल्या संशोधनाद्वारे पेटंट प्राप्त डिस्पोजमित्र उपकरणात कोविड-१९ काळात वापरून झालेल्या मास्कची सुरक्षित विल्हेवाट लावली. त्या काळातच सॅनिटायझरची बाजारात कमतरता निर्माण झालेली असताना, जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्वांनुसार त्यांनी स्वतःच सॅनिटायझर तयार करून गरजू लोकांना विनामूल्य वितरित केले. त्याचसोबत रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी त्यांनी इम्युनो बूस्टर तयार करून हजारो लोकांना मोफत वाटप केले होते.

भारताच्या २३० हून अधिक जिल्ह्यांमध्ये पाण्यात फ्लुराईडचे प्रमाण जास्त असल्यामुळे १० पेक्षा अधिक गंभीर आजार होतात. या समस्येवर उपाय म्हणून जोशी याने अ‍ॅक्वामित्र हे पेटंटप्राप्त संशोधन विकसित केले आहे. हे संशोधन अतिशय कमी खर्चात आणि कोणत्याही उर्जेशिवाय पाण्यातील फ्लुराईड कमी करण्यास मदत करते, त्यामुळे दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांना याचा मोठा फायदा होणार आहे.

पुष्यमित्रने विज्ञान, पर्यावरण आणि जीवनशास्त्र यासंबंधी तीन शैक्षणिक पुस्तके लिहिली असून, ती विद्यापीठांच्या अभ्यासक्रमातदेखील समाविष्ट आहेत. त्याचे २० हून अधिक आंतरराष्ट्रीय संशोधन पेपर जगभरातील विविध जर्नल्समध्ये प्रकाशित झाले आहेत. ऐतिहासिक आणि राजकीय विषयांवर त्याचे अनेक लेख प्रसिद्ध झाले आहेत. भारताच्या महान इतिहासाची विद्यार्थ्यांना ओळख करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्यदेखील त्याने केले आहे.

पुष्यमित्रने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक महत्त्वाच्या व्यासपीठांवर भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. ब्रिक्स संघटनेच्या विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोपक्रम कार्यसमूहात भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. स्टार्टअप आणि सामाजिक प्रभाव यावर भर देणाऱ्या जागृती २० यात्रेमध्ये त्यानी 'बिझ ज्ञान ट्री' स्पर्धेचे विजेतेपद मिळवले आहे. त्याने राष्ट्रीय युवा महोत्सवात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते. विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकले असून, संशोधनासाठी महाराष्ट्राच्या राज्यपालांकडून ‘अविष्कार’ संशोधन फेलोशिपनेही सन्मानित करण्यात आले होते.

महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा, महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज, स्वच्छ तंत्रज्ञान स्पर्धा आणि अविष्कार वैज्ञानिक संमेलन अशा अनेक प्रतिष्ठित वैज्ञानिक स्पर्धांमध्ये विजय संपादन केला आहे. त्याची प्रतिष्ठित इंडियन सायन्स काँग्रेसच्या सायन्स कम्युनिकेटर म्हणून निवड करण्यात आली होती. त्याच्या या अभूतपूर्व यशामुळे हिंगोली जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे.

Pushyamitra Joshi
हिंगोली : तरूणास मारहाण केल्याप्रकरणी तिघांना तीन वर्षाचा कारावास

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news