कळमनुरी, पुढारी वृत्तसेवा : कळमनुरी तालुक्यातील धानोरा (जहाँगिर) येथे शिवजयंती निमित्त मिरवणुकीत धक्का लागण्यावरून काही तरुणांनी गावातील दोन युवकांवर हल्ला करीत गंभीर जखमी केले . या प्रकरणी १० ते १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Hingoli News)
याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील धानोरा जहाँगीर येथे 23 फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्त मिरवणुकी चे आयोजन करण्यात आले होते. मिरवणुकीत युवक प्रवीण प्रफुल्ल पाईकराव याचा प्रणव माधव हरण या युवकास धक्का लागला. याचा राग मनात धरून मिरवणूक संपल्यानंतर प्रणव माधव हरण यांनी प्रवीण यास त्याच्या काकाच्या घरा जवळ गाठत तू मिरवणुकीत मला धक्का का मारला ? म्हणून वाद घालत लोखंडी रॉड ने मारहाण केली. तसेच प्रणवचे वडील माधव हरण व कळमनुरी येथील काही युवकांनी येथे पोहचत प्रवीण व तेथे असलेले नागसेन डोंगरे यालाही लोखंडी रॉड ने दगडाने मारहाण केली. व जातीवाचक शिवीगाळ केली. या मारहाणीत प्रवीण व नागसेन गजानन डोंगरे गंभीर जखमी झाले. दोघांना कळमनुरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने दोघांना नांदेडला हलविण्यात आले आहे.
या प्रकरणी प्रफुल्ल पाईकराव याच्या फिर्यादीवरून प्रणव व माधव या पितापुत्रासह ८ ते १० जणांविरुद्ध कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यातील आरोपी प्रणव माधव हरण, माधव हरण यांच्यासह चौघांना कळमनुरी पोलिसांकडून अटक केली आहे. इतर आरोपी पसार आहेत.