

हिंगोली : वीज कंपनीच्या वतीने मान्सूनपूर्व कामे आता सकाळी 7 ते 11 या वेळेतच केली जाणार आहेत. त्यामुळे वाढत्या उन्हाच्या तडाख्यात कर्मचाऱ्यांचा बचाव होणार असून नागरिकांनाही दुपारच्या वेळी सुरळीत वीजपुरवठ्यामुळे दिलासा मिळणार आहे.
सर्वत्र वीज कंपनीकडून मागील काही दिवसांपासून मान्सूनपूर्व दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. पावसाळ्यात वारंवार वीजपुरवठा खंडित होऊ नये या उद्देशाने ही कामे केली जात असून यामध्ये प्रामुख्याने वीज वाहिन्यांवर येणाऱ्या झाडाच्या फांद्या कट केल्या जात आहेत. तसेच आवश्यक तेथे वीज वाहिन्या बदलल्या जात असून तुटलेले पीन, डिस्क इन्सुलेटर्स बदलणे, रोहित्र बदलणे, फिडर पिलर, रिंगमेन युनीटची आर्थिंक तपासणे, ऑईल फिल्टर्ेशन, ऑईल टॉपिंगअप, रोहित्र पेटीची दुरुस्ती, तारांमधील झोल काढण्याचे काम केले जात आहे.
सध्याच्या स्थितीत सकाळी 10 ते दुपारी दोन ते चार वाजेपर्यंत ही कामे केली जात आहेत. मात्र सदर कामे करताना वीजपुरवठा खंडित करावा लागत आहे. दुपारच्या वेळी वीज पुरवठा नसल्याने नागरिकांकडून तक्रारी केल्या जात आहेत. याशिवाय उन्हाचा तडाखा वाढणार असून त्यामुळे विजेची मागणीही वाढणार आहे. मात्र उन्हाच्या तडाख्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा बचाव करणेही तेवढेच आवश्यक आहे. त्यानुसार वीज कंपनीने सदरील मान्सूनपूर्व दुरुस्तीची कामे सकाळी सात ते अकरा या वेळेतच करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दुपारी ग्राहकांसाठी वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याच्या सूचनाही वीज कंपनीच्या वरिष्ठ कार्यालयाने दिल्या आहेत. त्यामुळे आता दुपारच्या सुमारास वीजपुरवठा सुरळीत राहणार असल्याने ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.