

हिंगोली : हिंगोली ते कनेरगाव नाका मार्गावर बासंबा फाटा शिवारातील एका ढाब्याजवळील पुलावर पिकअप वाहनाचा अपघात होऊन अमरावती जिल्ह्यातील दोघांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी पहाटे घडली. राष्ट्रीय महामार्ग पथकाने तातडीने घटनास्थळी जाऊन दोघांना शासकिय रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकिय अधिकार्यांनी जाहिर केले.
हिंगोली ते कनेरगाव नाका या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 वर बासंबा शिवारात एका ढाब्याजवळ बुधवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास एका पिकअप वाहनाचा अपघात झाला. वाहनातील दोघेही गंभीर असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग पथकाला मिळाली होती. त्यावरून उपनिरीक्षक साईनाथ अनमोड, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शेषराव पोले, सय्यद तय्यबअली, बळीराम शिंदे, विकास गवळी तसेच बासंबा पोलिस ठाण्याचे शेख उमर, गजेंद्र बेडगे, भडंगे, वाळले यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी घटनास्थळी पिकअप वाहनाचा समोरील भागात दोघे जण अडकून पडल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्यांना तातडीने हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकिय अधिकार्यांनी त्यांची तपासणी करून दोघांचाही मृत्यू झाल्याचे जाहिर केले. पोलिसांनी वाहनातील कागदपत्रे व मयताकडील ओळख पत्रावरून त्यांची नांवे गणेश ठाकरे (25), मोहन ठाकरे (21,रा. महेशपूर, ता. दर्यापूर, जि. अमरावती) अशी असल्याचे स्पष्ट झाले. हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक शामकुमार डोंगरे, जमादार राजकुमार जमदाडे, शेख रहीम यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली.