

हिंगोली : जिल्ह्यात सध्या DAP खताचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून शेतकऱ्यांना खतासाठी कृषी केंद्रांवर चकरा माराव्या लागत आहेत. खरीप हंगाम तोंडावर आलेला असताना देखील प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना होत नसल्याने आज क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी यांच्या दालनामध्ये वाळू घेऊन ठिय्या आंदोलन करण्यात आले.
यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या निष्क्रिय कारभाराचा निषेध व्यक्त करत “शेतकऱ्यांना DAP खत तात्काळ उपलब्ध करून द्या” अशी जोरदार मागणी केली. जिल्ह्यातील अनेक कृषी केंद्रांवर खत उपलब्ध नसल्यामुळे शेतकरी आर्थिक व मानसिक त्रास सहन करत असून काही ठिकाणी खत साठवून ठेवले जात असल्याच्या तक्रारी देखील समोर येत आहेत.
आंदोलनादरम्यान प्रशासनाला स्पष्ट इशारा देण्यात आला की, पुढील आठ दिवसांत शेतकऱ्यांना DAP खत उपलब्ध करून दिले नाही तर क्रांतिकारी शेतकरी संघटना जिल्हा कृषी अधिकारी यांची खुर्ची उचलून येलदरी धरणामध्ये विसर्जित करेल. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत प्रशासनाने तात्काळ निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.