

Aundha Nagnath Nagarpanchayat Employees Strike
औंढा नागनाथ : औंढा नागनाथ नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी मागील १५ महिन्यांपासून प्रलंबित वेतनाच्या मागणीसाठी २३ डिसेंबर २०२५ रोजी सुरू केलेले काम बंद आंदोलन व बेमुदत उपोषण अखेर २६ डिसेंबर २०२५ रोजी आमदार संतोष बांगर यांच्या मध्यस्थीने मागे घेण्यात आले.
औंढा नागनाथ ग्रामपंचायत काळापासून कार्यरत असलेले स्वच्छता, सफाई व पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी २३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून नगरपंचायत कार्यालयासमोर आंदोलनात सहभागी झाले होते. नगरपंचायतीने रोजनदारीवर नवीन कर्मचारी नेमल्यास त्यांनाही काम करू न देण्याचा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला होता.
कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये १५ महिन्यांपासून थकीत असलेले वेतन तात्काळ अदा करणे, शासन नियमांनुसार किमान वेतनात वाढ करणे, सफाई व पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरीत सामावून घेणे, तसेच नगरपंचायतीमार्फत सर्व कर्मचाऱ्यांना अपघात विमा लागू करणे, यांचा समावेश होता. या आंदोलनास अनेक नगरसेवकांसह लहुजी सेनेनेही पाठिंबा दिला होता.
तीन दिवस चाललेल्या बेमुदत उपोषणामुळे औंढा नागनाथ शहरात सफाई कामगारांच्या अभावाने अनेक ठिकाणी अस्वच्छता पसरली होती. मात्र आमदार संतोष बांगर यांच्या हस्तक्षेपानंतर कर्मचाऱ्यांना तात्काळ दोन महिन्यांचे वेतन देण्याचे आणि उर्वरित थकीत वेतन लवकरच अदा करण्याचे आश्वासन देण्यात आले. या आश्वासनानंतर मधुकर मुळे, गणपत रणखांबे, गौतम मुळे, भिकू राठोड, रमेश थोरात, मुंजा रणखांबे, पंडित रणखांबे, मारुती पांढरे, गयाबाई रणखांबे, छायाबाई रणखांबे, रुक्मिणाबाई रणखांबे, लताबाई रणखांबे, धुरपतबाई सोनवणे, कांताबाई रणखांबे, राजाबाई रणखांबे आणि नंदाबाई रणखांबे यांनी आपले आंदोलन व उपोषण समाप्त केले.
आमदार संतोष बांगर व मुख्य कार्यकारी अधिकारी रविराज दरक यांच्या आश्वासनानंतर कर्मचाऱ्यांनी आजपासून पुन्हा कामास सुरुवात केली आहे. यावेळी नगराध्यक्ष कपिल खंदारे, उपनगराध्यक्ष मनोज देशमुख, माजी उपनगराध्यक्ष साहेबराव देशमुख, माजी सभापती अनिल देशमुख, नगरसेवक राहुल दंतरवार यांच्यासह इतर नगरसेवक उपस्थित होते.
कर्मचाऱ्यांनी कामावर परतल्यामुळे शहरातील स्वच्छता व्यवस्था पूर्ववत होणार असून नागरिकांच्या आरोग्याला निर्माण झालेला धोका आता टळणार असल्याचे नगरवासीयांनी समाधान व्यक्त केले आहे.