

हिंगोली: मागील अनेक वर्षांपासून कयाधू नदीचे पाणी भुयारी कालव्याच्या माध्यमातून इसापूर धरणात सोडून ते नांदेड जिल्ह्यासाठी सोडण्याचा प्रयत्न केला जात होता. या प्रयत्नाला आता यश आल्याचे दिसून येत आहे. 3 सप्टेंबर रोजी खरबी वळण बंधार्याच्या कामाची निविदा प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे कयाधूचे पाणी आता थेट नांदेडला जाणार असल्याने या निर्णयाविरोधात हिंगोलीतील जनतेमधून तीव्र संताप व्यक्त होऊ लागला आहे. हिंगोलीतील लोकप्रतिनिधींच्या नाकर्तेपणामुळेच हक्काचे पाणी नांदेडला पळविले जात असल्याचा आरोप होऊ लागला आहे. कयाधूचे पाणी इसापूर धरणात वळविल्यास जिल्ह्याचे वाळवंट होणार, हे मात्र निश्चित झाले आहे
गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ व राज्य शासनाकडून कयाधू नदीवर खरबी येथे बंधारा बांधून ते भुयारी कालव्याच्या माध्यमातून इसापूर धरणात सोडून ते पाणी नांदेड जिल्ह्याला वळविणार असल्याची चर्चा मागील अनेक वर्षापासून सुरू होती. या निर्णयाविरोधात माजी खासदार शिवाजी माने यांनी अनेकदा आवाज उठविला होता. परंतू माने यांच्या आवाजाकडे दुर्लक्ष करीत 3 सप्टेंबर रोजी उर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभागीय पथ क्र. 4 च्या कार्यकारी अभियंता कार्यालयाकडून निविदा काढण्यात आली आहे. यामध्ये खरबी वळण बंधारा, खरबी ते इसापूर जलाशय पाणी वहन प्रणालीचे बांधकाम व अनुशंगिक कामे या नावाने निविदा प्रकाशित करण्यात आली आहे.
यासाठी 995 कोटी 41 लाख रूपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. 4 सप्टेंबरपासून 18 सप्टेंबरपयर्र्ंत निविदा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 20 सप्टेंबर रोजी निविदा उघडण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्ह्याचा अनुशेष अद्यापही भरून काढण्यात आलेला नाही. 15 हजार हेक्टर सिंचन अनुशेष बाकी असताना हिंगोलीच्या हक्काचे पाणी नांदेडला वळविले जाणार आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्याचे वाळवंट होईल अशी भिती येथील नागरीकांमधून व्यक्त होऊ लागली आहे. कयाधू नदीवर उच्चपातळीचे बंधारे बांधण्याचे तर सोडाच त्याच नदीचे पाणी इसापूर धरणात सोडून ते नांदेडला पळविण्याचा घाट घातल्या गेल्याने राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांच्याविरोधात तीव्र संताप व्यक्त होऊ लागला आहे.
निविदा मंजूर झाल्यास हिंगोलीकरांच्या तोंडचे पाणी पळणार आहे. परिणामी ना सिंचन जिल्हा म्हणून ओळख असलेल्या जिल्ह्याचे वाळवंट होणार आहे. निविदा निघेपर्यंत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी झोपले होते काय? असा सवाल देखील संतप्त नागरिकांमधून उपस्थित होऊ लागला आहे. मागील अनेक वर्षापासून खरबी बंधार्याबाबत चर्चा होत होती. परंतू लोकप्रतिनिधींनी यावर आक्रमक भूमिका घेतली नाही. परिणामी आता बंधार्याच्या कामाची निविदा निघाल्यानंतर जाग आल्याने लोकप्रतिनिधींविरोधातही संताप व्यक्त होऊ लागला आहे.
मी मागील दहा वर्षांपासून हिंगोलीच्या सिंचन अनुशेषासाठी लढा देत आहे. कयाधू नदीवर उच्च पातळीचे बंधारे बांधावेत, अशी मागणी सतत करीत आलो आहे. शासनाने बंधारे तर केलेच नाहीत. परंतू, हिंगोलीच्या हक्काचे कयाधू नदीचे पाणी आता इसापूर धरणात सोडून ते नांदेडला नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु वाटेल ती किंमत मोजण्याची आमची तयारी आहे. येत्या दोन दिवसांत मोठे आंदोलन उभे करू, असा इशारा माजी खासदार शिवाजी माने यांनी दिला आहे.
हिंगोलीच्या पाण्याचा एक थेंबही नांदेडला जाऊ देणार नाही. हिंगोलीचे वाळवंट होऊ देणार नाही. निविदा प्रक्रिया कशी रद्द करता येईल यासाठी मी मुख्यमंत्री यांची भेट घेणार आहे. निविदा प्रक्रिया रद्द करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. जीव गेला तरी बेहत्तर पण हिंगोलीचे पाणी नांदेडला जाऊ देणार नाही, असे आमदार संतोष बांगर यांनी सांगितले.
कयाधू नदीवरील खरबी येथील बंधारा झाल्यास हिंगोलीच्या शेतीचे भविष्य अंधारात जाईल. हा डाव आम्ही हाणून पाडू. यापूर्वी पण राजकीय बळावर हक्काचे पाणी पळविले आहे. पुन्हा डाव आखला आहे. हिंगोलीच्या भविष्यासाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. त्यासाठी कोणतीही किंमत मोजण्यास मी तयार असल्याचे भाजपचे नेते रामदास पाटील सुमठाणकर यांनी सांगितले.